
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, मध्य वैतरणा व मोडकसागर धरण क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली असून सर्व धरणे अंदाजे 50 टक्क्यांनी भरली आहेत. मुंबईकरांसाठी ही गूड न्यूज असून त्यांचे पाणी टेन्शन संपले आहे.
जून महिना कोरडा गेल्यामुळे धरणांनी तळ गाठला होता. परिणामी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. ग्रामीण भागात टँकर सुरु करण्यात आले तर मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागले. पावसाअभावी तालुक्यातील शेतीची कामेही रखडली होती. मात्र जुलै सुरु होताच शहापूर तालुक्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे भातसा, तानसा व मध्य वैतरणा धरणातील पाणी साठय़ात मोठी वाढ झाली.
आठवडाभरातच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता
सद्यस्थितीत मोडकसागर 52.22, भातसा 42.54 व तानसा धरण 42.85 टक्के भरले आहे. समाधानकारक पाणी साठय़ामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास आठवडाभरात धरणे ओव्हरफ्लो होईल, अशी शक्यता तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी वर्तवली.
विहार तलाव ओव्हरफ्लो
मुंबई आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी ‘विहार तलाव’ सोमवारी रात्री 9 वाजता ओसंडून वाहू लागला. या तलावाची क्षमता 27,698 दशलक्ष लिटर एवढी आहे. विहार तलावातून दररोज सरासरी 90 दशलक्ष लिटर (9 कोटी लिटर) एवढय़ा पाण्याचा पुरवठा केला जातो. विहार तलाव गेल्या वर्षी 18 ऑगस्ट 2025 रोजी पूर्ण भरून वाहू लागला होता.






























































