
यंदाच्या पावसात झाडे मुळांपासून कोसळत आहेत. एका वर्षात जितकी झाडे पडतात. त्याच्या 50 टक्के झाडे एका दिवसात पडली आहेत. जिथे बांधकामे होत आहेत तिथली झाडे कोसळण्याचे प्रमाण जास्त आहे. हा योगायोग आहे की यामागे काही वेगळे कारण आहे? झाडांच्या मुळांवर नेमकं कोण उठलंय? झाडे पडतायत की पाडली जाताहेत, असा सवाल उपस्थित झाला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 833 झाडे पडली आहेत, तर 1238 फांद्या पडल्या आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी सुमारे 70 ते 80 किमी वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस अशी कारणं देण्यात आली आहेत. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे झाडे पडत नाहीत, असे महापालिका आयुक्त सांगत आहेत. मग झाडे एवढय़ा संख्येने का पडत आहेत, असा सवाल उपस्थित झाला आहे. दादर, माटुंगा, गोरेगाव, अंधेरी, चेंबूर अशा काही ठिकाणी झाडे जास्त पडली आहेत. काही ठिकाणी बिल्डर लॉबीच्या हितासाठी झाडांना इंजेक्शन देऊन ती हळूहळू संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप जागरूक नागरिकांनी वेळोवेळी केला आहे. बऱयाच ठिकाणी तर पालिकेचे कंत्राटदार मनमानी पद्धतीने वृक्षछाटणी करत आहेत.
‘बिल्डर आपल्या कामात अडथळा ठरतील अशा झाडांना इंजेक्शन मारून ती कमकुवत करतात. त्यानंतर तीन-चार वर्षांनी ती झाडे उन्मळतात. मात्र या गोष्टी कुणाच्या लक्षात येत नाहीत, असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळेदेखील झाडांची मुळे कमकुवत होत आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
काँक्रिटीकरणामुळं झाडं पडत आहेत. तसेच वृक्षछाटणी तज्ञांच्या देखरेखीखाली केली जात नाही. बांधकामासाठी खोल खड्डे खोदले जात आहेत. जाहिरातींची हार्ंडग दिसावीत म्हणून फांद्या तोडल्या जातात. तुम्ही अंधेरीच्या जे. बी. नगरमध्ये बघा, झाडांच्या बाबतीत कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. त्याविरोधात मी वारंवार बोलत असतो. रस्त्याच्या रुंदीकरणात गेलेली झाडं याबद्दल मी संबंधित अधिकाऱयांना अनेकदा पत्रं लिहिली आहेत. – गॉडफ्रे पिमेंटा, वॉचडॉग फाऊंडेशन
एक्स्प्रेस वेवरील झाडांना काय झाले?
ग्रामीण भागांचा विचार केला तर तिथं एक झाड 150 ते 160 वर्षं जगतं. झाडांचं वयोमान पूर्ण झाल्यावर ती कोसळतात, पण शहरात तसं होत नाही. झाडं पडावी अशी परिस्थिती निर्माण केली जाते. प्रकल्पांसाठी अडथळा येत असेल तर त्यांना मिठाचे पाणी टाकून किंवा ऑसिड टाकून मारण्याचे प्रकार होतात. तुम्ही ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जाऊन बघा, तिथली झाडं मोठय़ा प्रमाणात सुकत आहेत. पिंपळाचं एक झाड बहरलेलं दिसेल तर त्याच्या बाजूची बाकीची झाडं सुकलेली दिसतील. हा काय प्रकार आहे ते लक्षात घ्या. – डॉ. नागेश टेकाळे, वृक्ष अभ्यासक




























































