केजरीवालांना डॉक्टरांचा सल्ला घेण्याची परवानगी नाही, दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने फेटाळली याचिका

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी गेल्या 22 दिवसांपासून तिहार तुरुंगात असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी 300वर जात असल्याने त्यांना व्हीसीद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज कोर्टाने फेटाळली.

केजरीवाल यांना जामीन देण्याची विनंती करणारी जनहित याचिका कायद्याचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याने दिल्ली उच्च न्यायालयात केली होती ती आज फेटाळली गेली. सर्व प्रलंबित खटल्यांप्रकरणी केजरीवाल यांना अतिविशेष अंतरिम जामीन दिला जावा, अशी जनहित याचिका होती. मात्र प्रलंबित सर्व प्रकरणांमध्ये असा जामीन देता येत नाही, असे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्याला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला.