रेल्वे रुळावर उभे राहून माथेफिरूचा हाय व्होल्टेज ड्रामा; लोकल अडवली; मोटरमनच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान आज एका माथेफिरूने थेट रुळावर उतरत हाय व्होल्टेज ड्रामा केला. समोरून येणाऱ्या धावत्या लोकलसमोर उभे राहात त्याने ही लोकल अडवण्याचा प्रयत्न केला. मोटरमनने प्रसंगावधान राखत वेळेत आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर प्रवाशांनी या माथेफिरूला फटकवत रेल्वे रुळाबाहेर आणले.

आज सकाळी लोकल वसईकडून चर्चगेटच्या दिशेने निघाली होती. यावेळी नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान एक माथेफिरू अचानक रुळावर अवतरला आणि त्याने चक्क ही लोकल अडवण्याचा प्रयत्न केला. मोटरमनने जोरजोरात हॉर्न वाजवला. मात्र तो इसम जागेवरून हटला नाही. तो हात दाखवून लोकलला थांबवण्याचा इशारा करत होता. अखेर मोटरमनने प्रसंगावधान दाखवून आपत्कालीन ब्रेक मारले. त्यामुळे ही लोकल थेट त्या माथेफिरूच्या अगदी जवळ येऊन थांबली. त्यामुळे त्याचा जीव बचावला.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सिग्नल हिरवा असतानाही लोकल का थांबली हे पाहण्यासाठी महिल्या डब्याच्या मागील पुरुषांच्या डब्यातील एक तरुण खाली उतरला तेव्हा त्याला हा ‘ड्रामा’ दिसला. त्याने थेट त्या माथेफिरूच्या कानफटात लगावली आणि त्याला रुळाबाहेर खेचत आणले. हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान रेल्वे सुरक्षा बल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे