दहिसर, बोरिवली, कांदिवली अन् मालाडकरांना मिळणार समुद्राचे गोडे पाणी; जलपुरवठा बोगदा बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईची वाढती पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका मनोरी येथे समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दररोज २०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार असून, पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि मालाड परिसरात या पाण्याचा पुरवठा केला जाईल.

मनोरी येथील पंपिंग स्टेशनमधून हे पाणी पुरवण्यासाठी मनोरी ते चारकोप येथील पालिका उद्यान आणि पुढे महावीर नगर (कांदिवली) असा ७.१७५ किमी लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. या प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुंबईची दररोजची पाण्याची मागणी ४६०० दशलक्ष लिटर इतकी आहे; मात्र उपलब्ध जलसाठ्यानुसार पालिकेकडून दररोज ४१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईची वाढती मागणी लक्षात घेता समुद्राच्या पाण्याचे निःक्षारीकरण (Desalination) करून ते पिण्यायोग्य केले जाणार आहे.

मनोरी येथील प्रकल्पात तयार होणारे पाणी कांदिवली व दहिसर येथील जलपुरवठा यंत्रणेत पोहोचवण्यासाठी हा बोगदा अत्यंत महत्त्वाचा आहे. २२४१ कोटी रुपयांच्या या बोगदा प्रकल्पाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली असून, समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.