‘दामोदर’चे मिनी थिएटर करू नका…कलाकार मंडळी उपोषणाच्या तयारीत

रंगभूमी आणि सांस्कृतिक इतिहासाची गौरवशाली परंपरा जोपासणारे परळ येथील दामोदर नाटय़गृह 1 नोव्हेंबरपासून पुनर्बांधणीसाठी बंद आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली मिनी थिएटर बांधून त्याचा एफएसआय दुसरीकडे वापरण्यात येणार आहे, असा संशय सहकारी मनोरंजन मंडळाने व्यक्त केला आहे.  नाटय़गृह वाचवण्यासाठी काही दिवसांपूर्वी कलाकारांनी  आंदोलन केले. मात्र तरीही प्रशासन दाद देत नसल्याने आता ‘दामोदर बचाव’चे सदस्य उपोषणाच्या तयारीत आहेत.

दामोदरच्या वास्तूचे पुनर्निर्माण करायचे झालेच तर नाटय़गृह अधिक मोठे आणि अत्याधुनिक उभारले जावे. सहकारी मनोरंजन मंडळाला पूर्वीप्रमाणेच त्या नाटय़गृहात कार्यालयाची जागा द्यावी, अशी मागणी सहकारी मनोरंजन मंडळ केली आहे.

सहकारी मनोरंजन मंडळाला हवी जागा

1922 पासून दामोदरच्या वास्तूत सहकारी मनोरंजन मंडळ ही संस्था कार्यरत आहे. पुनर्बांधणीत जागा मिळावी अशी मंडळाची मागणी आहे, मात्र याबाबत कोणतेही ठोस आश्वासन सोशल सर्व्हिस लीगकडून मिळालेले नाही. उलट वीज आणि पाणीपुरवठा गेल्या महिनाभरापासून बंद केला आहे. यामुळे व्यथित होऊन आता कलाकार मंडळी उपोषण करण्याचा तयारीत आहेत, असे चौगुले म्हणाले.

आसनक्षमता कमी होणार

सहकारी मनोरंजन मंडळाचे संचालक मंडळ सदस्य श्रीधर चौगुले म्हणाले, यापूर्वीच्या नूतनीकरणात 803 च्या ऐवजी 763 सीट्स नाटय़गृहात उरल्या. आताच्या पुनर्बांधणीमध्ये 763 सीट्सऐवजी प्रस्तावित 525 सीट्समध्ये नाटय़गृह उभे राहणार आहे. 500 आसनक्षमतेच्या प्रस्तावित मिनी थिएटरमध्ये मराठी नाटक आणि लोककला जगणार नाही. एवढय़ा कमी आसनक्षमतेत निर्माते प्रयोग कसा करणार?