
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरी केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घराघरांतूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केले जाईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कोरोनाला रोखण्यासाठी नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. चैत्यभूमी स्मारक तसेच मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱया ठिकाणी गर्दी न करता अभिवादन केले जाईल आणि राज्यभरातील अनुयायांनाही जयंती साजरी करण्याच्या शासन परिपत्रकातील नियमावलींचे पालन करून साधेपणाने जयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मुंबई उपनगर जिह्याचे पालक मंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी उपस्थित होते.

































































