पोटातून काढले 11 कोटींचे कोकेन

सिएरा लिओन येथून मुंबईत आलेल्या पुरुष प्रवाशाने पोटात लपवून ठेवलेले 11 कोटींचे कोकेन महसूल गुप्त वार्ता संचालनालयाने (डीआरआय) ने जप्त केले. जे. जे. च्या डॉक्टरांनी त्या प्रवाशाच्या पोटातून कोकेन असलेल्या कॅप्सूल बाहेर काढल्या.

परदेशातून एक जण ड्रग घेऊन येणार असल्याची माहिती डीआरआय ला मिळाली. त्या माहितीनंतर तीन दिवसांपूर्वी डीआरआयच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचून एका प्रवाशाला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने पोटातून कोकेन आणल्याची डीआरआयला कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. जे.जे.तील डॉक्टरांनी त्याचा पोटाचा एक्सरे काढला. त्या प्रवाशाच्या पोटातून 74 कोकेनच्या पॅप्सूल बाहेर काढल्या. त्या पॅप्सूलमध्ये 1108 ग्रॅम कोकेन होते. जप्त केलेल्या कोकेनची माहिती सुमारे 11 कोटी रुपये इतकी आहे. कोकेन तस्करीप्रकरणी त्या प्रवाशाविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. त्याला कोकेन तस्करीच्या मोबदल्यात काही रक्कम मिळणार होती. त्या प्रवाशाला ते कोकेन कोणी दिले याचा तपास डीआरआयचे पथक करत आहे.