आधी पाठलाग केला, मग धडक दिली; गुरुग्राममध्ये महिला बाईकरला कारचालकाने उडवले, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुरुग्राममध्ये महिला बाईकरला उडवणाऱ्या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कल्याण बैंस असे आरोपी कारचालकाचे नाव आहे. गोल्फ कोर्स रोडवर घडलेल्या या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आणि अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात भादवि कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याखाली आरोपीला 10 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात वापरलेली पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी सियाझ कार पलवल येथे नोंदणीकृत असून ती सध्या आसाममध्ये कार्यरत असलेल्या एका हिंदुस्थानी लष्करातील सैनिकाची आहे. आरोपी कल्याण बैंसला याने घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच ही कार त्याच्याकडून मागून घेतली होती. कल्यान बैंसला हा पलवलमधील एका जिमचा मालक असून तो माजी कबड्डीपटू आहे.

बाईकस्वार वेग वाढवून-कमी करून माझ्या कारला कट मारत होते. बाईकवर महिला आहे हे मला माहीत नव्हते आणि या घटनेबद्दल मला वाईट वाटत आहे, असे फरार होण्याआधी दिलेल्या एका मुलाखतीत कल्याण म्हणाला होता. मात्र, महिला बाईकर सिया हिने आरोपीच्या या दाव्यांचा खरपूस समाचार घेतला. आम्ही वेग कमी-जास्त करत होतो तरीही संपूर्ण रस्ता आमचा पाठलाग करण्याचा तुम्हाला काय अधिकार होता? माझ्या पाठीवर स्पष्टपणे दिसणारी लांब वेणी होती, तुम्ही शेजारी कार आणून मला बाईक थांबवण्याचा इशारा केला होता, मग महिला आहे हे माहीत नव्हते असे कसे म्हणू शकता? असा सवाल तिने उपस्थित केला.

कारचालकाने पहिल्या लेनमधून थेट तिसऱ्या लेनमध्ये येऊन तिच्या अप्रिलिया RS 457 स्पोर्ट्स बाईकला जोरदार धडक दिली आणि तिला रस्त्यावर फरफटत नेले. जर तुम्हाला खरंच वाईट वाटले होते, तर तुम्ही तिथेच गाडी थांबवून माझी विचारपूस का केली नाही? या अपघातात माझा जीवही जाऊ शकला असता, असेही सिया म्हणाली.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणावरून आरोपीचा हेतू स्पष्ट होत असून त्यावर कलम 109 जोडण्यात आले आहे. पीडित महिलेचा जबाब नोंदवला जात असून, गुरुग्राम पोलीस अशा बेदरकार आणि धोकादायक ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहेत, असे गुरुग्राम पोलीस प्रवक्ते एएसआय संदीप कुमार यांनी सांगितले. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.