ज्ञानेश कुमारला शिवसैनिकांनी ठाण्यातून बांधून आणले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील गर्जना मोर्चात ठाण्यातील शिवसैनिकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या दिसणाऱ्या डुप्लिकेट व्यक्तीला बांधून नेले. शिवसैनिकांनी ठाणे रेल्वे स्थानकात त्याला पकडले आणि लोकलमध्ये बसवून दोरखंडाने बांधले. ‘निवडणूक आयुक्तांना तुरुंगात टाका’, ‘ज्ञानेश कुमार चोर है…’ आदी घोषणांनी रेल्वे स्थानक परिसर दणाणून गेला होता. यावेळी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला संघटक रेखा खोपकर, प्रमिला भांगे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख अनिश गाढवे, उपशहरप्रमुख सचिन चव्हाण, वसंत गव्हाळे, मनसेचे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेवक अभिजित पवार आदी उपस्थित होते.

हटके पोस्टरबाजी

मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी भ्रष्ट निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त करणारी एकापेक्षा एक सरस पोस्टर्स झळकवली. ‘ज्ञानेश ज्ञानेश YES मोदीजी, व्होट चोरी YES मोदीजी,’ ‘प्रादेशिक पक्ष पह्डून चार, लोकशाहीवर करून वार, निवडणूक आयुक्त झाले लाचार, असे हे आमचे ज्ञानू कुमार’, ‘ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा’, ‘ज्ञानेश कुमार हाय हाय’, ‘ज्ञानेशकुमारला हटवू, लोकशाही वाचवू’, ‘संविधान बचाओ, चुनाव बचाओ’ अशा विविध घोषणांची पोस्टर्स मोर्चामध्ये झळकवण्यात आली.