
राज्यातील काही भाजप नेत्यांचे कारनामे उघड होण्याच्या मार्गावर असतानाच ईडीने पुन्हा सक्रिय होत मंगळवारी मुंबई व ठाण्यात अंडरवर्ल्डशी संबंधित 10 ठिकाणी छापेमारी केली. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या नागपाडय़ातील बंद घराची ईडीच्या पथकाने झाडाझडती घेतली. तसेच छोटा शकीलचा नातेवाईक सलीम प्रूटला ताब्यात घेतले. ईडीची अंडरवर्ल्डविरोधातील ही आतापर्यंतची मोठी कारवाई ठरली आहे.
मुंबईवरील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अलीकडेच एफआयआर दाखल केला आहे. तो एफआयआर तसेच गुप्तचर यंत्रणांकडील गुप्त माहितीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली. 90 च्या दशकापासून फरार असलेल्या दाऊदचे नातेवाईक व साथीदारांचा मनी लॉण्डरिंग प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे.
काही दिवसांपूर्वी ईडीला अंडरवर्ल्डच्या पंजाब कनेक्शनची माहिती मिळाली होती. पंजाबमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आयएसआय ही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा अंडरवर्ल्डची मदत घेत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पेंद्रीय तपास यंत्रणेने मुंबईत अंडरवर्ल्डविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्या हवाला, खंडणी आणि बेकायदा मालमत्ता व्यवहारांशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी ईडीने मंगळवारी धाडींचा धडाका लावला. यावेळी ताब्यात घेण्यात आलेला छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूटला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
ईडीच्या पथकाने दक्षिण मुंबईतील नऊ आणि ठाण्यातील एका ठिकाणी धाडी टाकून झाडाझडती घेतली. यात दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर आणि इक्बाल कासकरच्या मालमत्तांचा समावेश आहे. इक्बाल सध्या तुरुंगात आहे. त्याला मनी लॉण्डरिंगच्या पुढील तपासासाठी ईडीकडून ताब्यात घेतले जाणार असल्याचे वृत्त आहे.

































































