
राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप संदेश पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विदेशातील मोबाईल क्रमांकावरून आलेल्या या मेसेजप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सायबर फसवणूक आणि ओळख गैरवापराच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.
गृह विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने मनीषा म्हैसकर यांचे नाव आणि प्रोफाइल पह्टो वापरून व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवला. या संदेशातून इम्रान खान यांच्या नावावरील बँक खात्यात तातडीने 50 हजार रुपये वर्ग करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, विदेशातील मोबाईल क्रमांकावरून मेसेज आल्याने अधिकाऱ्याला संशय आला. त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्याशी संपर्क साधून संदेशाची खातरजमा केली. त्यानंतर हा प्रकार बनावट असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, गृह विभागातील इतर काही अधिकाऱ्यांनाही अशाच पद्धतीचे संदेश पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. मंत्रालयातील गृह विभागातील अधिकारी सागर पाटील यांना 13 ऑगस्ट रोजी, तर जयसेन इंगोले यांना त्याच स्वरूपाचा संदेश मिळाला. सेल अधिकारी मंगेश जाधव यांनाही 12 ऑगस्टला अशाच प्रकारचा संदेश आल्याची नोंद आहे. या प्रकरणी गृह विभागातील सेल अधिकारी आनंदा गोरे यांनी तक्रार दाखल केली आहे.
सायबर पोलिसांकडून आता संदेश पाठविण्यासाठी वापरण्यात आलेले परदेशी क्रमांक, संबंधित व्हॉट्सअॅप खाती आणि बँक खात्यांची माहिती तपासली जात आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाचा आणि प्रोफाइल पह्टोचा वापर करून आणखी कोणाला अशा प्रकारे लक्ष्य करण्यात आले आहे का, याचाही तपास सुरू आहे.



























































