तिसऱ्या मुंबईच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळले; प्रकल्पासाठी एक इंचही जमीन देणार नाही !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिसऱ्या मुंबईच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज उरणच्या शेतकऱ्यांनी पिटाळून लावले. जमिनीचे मालक आम्ही.. आधी आमच्याशी चर्चा करा, असे खडेबोल सुनावत शेतकऱ्यांनी पथकाला घेराव घातला. भांडवलदार धनिकांचे बटीक होऊ नका.. काही झाले तरी एक इंचही जमीन आम्ही तिसऱ्या मुंबईसाठी देणार नाही असे ठणकावले. भूमिपुत्रांचा हा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण गुंडाळून काढता पाय घेतला.

निर्णय उरण, पनवेल, पेण तालुक्यातील १२४ महसुली गावे आणि कर्जत व अलिबागची वाढीव ७४ गावे अशा एकूण १९८ गावांच्या हद्दीत तिसऱ्या मुंबईचा प्रकल्प राबवला जाणार आहे. शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर घेण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र सरकारने त्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष चालवले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीविरोधात दोन वर्षांपासून संघर्षाची भूमिका घेतली आहे. भूसंपादनाला एमएमआरडीए केएससी नवनगर (तिसरी मुंबई) विरोधी समितीच्या माध्यमातून सुमारे २५ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपल्या लेखी हरकती भूसंपादन विभागाकडे लेखी स्वरूपात नोंदवल्या आहेत.

लढ्याची जोरदार तयारी
आंदोलनाची जोरदार तयारी सुरू असताना आज सकाळीच चिरनेर गावात जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी अधिकारी आले. संतोष ठाकूर, सुरेश पाटील, प्रफुल खारपाटील तसेच अन्य शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना पिटाळून लावले. याआधीही तीनवेळा सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले असल्याची माहिती एमएमआरडीए केएससी नवनगर (तिसरी मुंबई) विरोधी समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील व सरचिटणीस रुपेश पाटील यांनी दिली.

सरकारचे धोरण हुकूमशाहीचे
सरकारचे धोरण हुकुमशाही पद्धतीचे आणि लोकशाही प्रणालीच्या विरोधी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. २२.५ टक्क्यांची फसवी योजना म्हणजे शेतकऱ्यांना बिल्डर लॉबीच्या दावणीला बांधणारी आणि त्यांना देशोधडीला लावणारी आहे. शेतकऱ्यांनी या योजनेस तीव्र आक्षेप घेतला असून कोणीही या योजनेस संमती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती एमएमआरडीए केएससी नवनगर (तिसरी मुंबई) विरोधी समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील व सरचिटणीस रुपेश पाटील यांनी दिली.