सोलापुरात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन, गोकुळ साखर कारखान्याने 130 कोटी रुपये थकविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल 130 कोटी रुपये थकविणाऱ्या गोकुळ साखर कारखान्याविरुद्ध 17 दिवसांपासून आंदोलन करणारे शेतकरी आक्रमक झाले. पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता शेतकऱ्यांनी सोलापुरात तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केले. दरम्यान, गोकुळ कारखाना भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे समर्थक दत्ता शिंदे यांचा आहे. शेतकऱयांनी चेअरमन शिंदे आणि महायुती सरकारविरोधात तीक्र संताप व्यक्त केला.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे गोकुळ साखर कारखाना असून, या कारखान्याने सोलापूर व धाराशीव जिह्यातील शेतकऱ्यांकडून ऊस घेतला, पण बिलाचे पैसे दिले नाहीत. साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे तब्बल 130 कोटी 46 लाख 25 हजार रुपये थकविले आहेत. गेल्या 17 दिवसांपासून असंख्य शेतकरी कुटुंबीयांसह पूनम गेटसमोर आंदोलन करीत आहेत. परंतु प्रशासन, सरकारकडून अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज जलतरण तलावात जलसमाधी आंदोलन केले.

z आंदोलन चिरडण्यासाठी 200 पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेटस् लावले होते. संतप्त शेतकऱयांनी पोलिसांना न जुमानता तलावात उतरून आंदोलन केले. यामुळे पोलीस आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली. आम्हाला हक्काचे पैसे हवेत आश्वासनांची भीक नको, एकीकडे शेतकरी पोशिंदा म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवायचे काम सरकार करत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱयांनी केला.