
महाराष्ट्रातील पहिला 105 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर जिह्यातील ईराई धरणात उभा राहणार आहे. त्यासाठी महानिर्मिती आणि सतलज जल विद्युत निगममध्ये (एसजेव्हीएम) करार झाला आहे. पुढील पंधरा महिन्यांत या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होणार असून त्याचा प्रतियुनिटचा दर केवळ 3 रुपये 93 पैसे असणार आहे. येथे तयार होणारी वीज पुढील 25 वर्षे महानिर्मितीला पुरवली जाणार आहे.
कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. तसेच दिवसोंदिवस कोळशाच्या किमती वाढत असल्याने विजेचे दरात वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने अपारंपरिक ऊर्जानिर्मितीची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून चंद्रपूर जिह्यातील ईराई धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर मागवले होते. त्यानुसार 105 मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारणे, चालवणे आणि वीजनिर्मिती करण्याचे टेंडर दिले आहे. हा प्रकल्प धरणातील पाण्याच्या पृष्ठभागावर 525 एकर जागेत असणार आहे. त्याच्या उभारणीसाठी सुमारे 730 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दरम्यान, एसजेव्हीएमने याआधी 1000 मेगावॅटचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला.
वर्षाला 230 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होणार
या सौर ऊर्जा प्रकल्पातून वर्षाला 230 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होणार आहे. सदरची वीज थेट ग्रीडमध्ये टाकली जाणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे 2 लाख 65 हजार टन कार्बनचे उत्सर्जन कमी होणार आहे.
































































