गोवर रुबेला लसीकरणामुळे आणखी पाच मुलींची प्रकृती गंभीर

493

राजेश देशमाने । बुलढाणा

गोवर रुबेला लस दिल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील तीन शालेय विद्यार्थ्यांना मंगळवारी रात्री प्रकृती गंभीर झाली होती. बुधवारी दुपारी पुन्हा बुलढाणा तालुक्यातील पाच मुलींची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मोठा गाजा-वाजा करुन सरकारने गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी संपूर्ण राज्यभर केला होता. बुलढाणा येथे सहकार विद्यामंदिरात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे व जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे यांच्याहस्ते बुलढाणा जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला.

सहकार विद्यामंदिरातील इयत्ता 9 वीत शिकणार्‍या विराट अरुण जवंजाळ या विद्यार्थ्याला लस दिल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याला तत्काळ बुलढाणा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आता उपचारानंतर त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच बुलढाणा तालुक्यातील मातला येथील जि.प. शाळेत शिकणार्‍या 8 वीतील वैष्णवी बाबुराव कुंजरगे या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर झाली होती. तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील जि.प. शाळेतील 6 वीत शिकणार्‍या पायल संजय पवार या मुलीलाही या गोवर रुबेला लसीमुळे प्रकृती गंभीर झाली आहे. तिला चिखली येथील डॉ. खेडेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. या दोन्हीही मुलींची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी ‘सामना’ ला दिली आहे.

बुधवारी पुन्हा बुलढाणा तालुक्यातील मढ येथील चक्रधर स्वामी विद्यालयातील 6 ते 10 वीच्या विद्यार्थिनींना दुपारी गोवर रुबेला लस दिल्यानंतर मुलींना उलट्या येणे, खाज सुटणे, बोलता न येणे असे प्रकार सुरु झाल्यामुळे शाळेचे प्राचार्य शाम साखळीकर यांनी भाग्यश्री रविंद्र भोपळे (15), शबाना शरीफ बागुल (14), हिना जलाल बागुल (14), शिवाणी गोपाल सोळंके (12), आशा विजय गवळी (15) या पाच मुलींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. त्यापैकी शिवाणी गोपाल सोळंके हिची प्रकृती गंभीर असल्यामुळे व बोलता येत नसल्यामुळे तिला डॉ. शेवाळे यांच्या खाजगी दवाखान्यात भरती केले. तिच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गोवर रुबेला लसीकरणामुळे मुलांना खाज येणे, मळमळ होणे, अंगावर पुरळ येणे, उलट्या होणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या