
हस्तिदंत विकण्यासाठी आलेल्या चौघांना कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून हस्तिदंत, तीन दुचाकी आणि इतर साहित्य असा 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राहुल भीमराव रायकर (वय 26, रा. कसबाबावडा, कोल्हापूर), बालाजी हरिश्चंद्र बनसोडे (वय 30, रा. विजयनगर, कोल्हापूर), कासीम शमशुद्दीन काझी (वय 20, रा. मिरज) आणि हणमंत लक्ष्मण वाघमोडे (वय 39, रा. लोणारवाडी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
खरशिंग-दंडोबा रस्त्यालगत असलेल्या मठासमोर काहीजण हस्तिदंत विकण्यासाठी आल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल आटपाडकर आणि पोलीस नाईक फकीर यांच्या पथकाने सापळा रचून या चौघांना अटक केली. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.































































