जानेवारी अखेरपासून गोखले ब्रिज बांधणार, पालिकेकडे पाच कंपन्यांकडून निविदा सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा धोकादायक गोखले ब्रिज जानेवारीअखेरपासून नव्याने बांधण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. यासाठी पालिकेकडे पाच कंपन्यांकडून निविदा सादर करण्यात आल्या आहेत. या पुलासाठी पालिकेकडून 90 कोटींचा खर्च केला जाणार आहे.

गोखले ब्रिज 3 जुलै 2018 रोजी कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे पुलाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने एप्रिलपासून आपल्या हद्दीमधील गोखले पुलाचे नव्याने बांधकाम करण्यास सुरुवात केली असून हे काम 90 टक्के पूर्णही झाले आहे, मात्र रेल्वे हद्दीमधील पूल धोकादायक झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे हा भागही पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 7 नोव्हेंबरपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

रेल्वेकडून पूल पाडण्याची प्रतीक्षा

गोखले ब्रिज 1975 मध्ये बांधण्यात आला असला तरी रेल्वे हद्दीमधील धोकादायक पूल आपण पाडू शकत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केल्यामुळे रेल्वेने पूल पाडण्यासाठी निविदा मागवल्या आहेत, मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे रेल्वेकडून हा पूल पाडून पालिकेकडे केव्हा हस्तांतरित होतो, यावर पुलाचे नवे बांधकाम सुरू होणे अवलंबून राहणार आहे. मे 2023 पर्यंत पुलाची एक लेन सुरू करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.