गोरेगाव येथील मोरारजी मिल म्हाडा, संकुल-1 बी गृहनिर्माण संस्थेच्या कारभाराची होणार चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव पूर्व पहाडी येथील मोरारजी मिल म्हाडा संकुल-1 बी या गृहनिर्माण संस्थेच्या कारभाराची चौकशी होणार आहे. त्याबाबतचे आदेश म्हाडाच्या उपनिबंधकांनी दिले आहेत. या गृहनिर्माण संस्थेमधील गैरकारभाराची चौकशी करावी म्हणून शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने पाठपुरावा केला आहे.

मोरारजी मिल म्हाडा संकुल-1 बी या गृहनिर्माण संस्थेचे कार्यकारी मंडळ मनमानीपणे काम करत आहे. तसेच वारंवार दंड आकारून सभासदांना नाहक त्रास दिला जात आहे. सभासदांना अद्याप भाग प्रमाणपत्रांचे वाटप केलेले नाही. याबाबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत उपनिबंधक आदिनाथ दगडे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 89 अ अन्वये गृहनिर्माण संस्थेची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकाऱयाची नेमणूक केली असल्यामुळे संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.