
जुलैच्या सुरुवातीला धुमापूळ घालून गेलेल्या पावसाने गेल्या दोन आठवड्यांपासून दडी मारली असली तरी आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून हवेत बाष्पही वाढून पावसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यात जोरदार वाऱ्यासह धो धो पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
‘एल निनो’च्या प्रभावामुळे यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यातच संपूर्ण जून महिना पावसाने ओढ दिली होती. मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच जोरदार बरसायला सुरुवात केली. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे पाऊस कसर भरून काढण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र गेल्या दोन आठवडय़ापासून पाऊस गायब झाला. मात्र आता पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने दोन दिवसांतच मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने दिलासा मिळाला आहे.
बळीराजाला दिलासा, पाणी प्रश्न मिटणार
पाऊस उशिरा झाल्यानंतर पुन्हा गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर उगवलेले बियाणे करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय राज्यातील अनेक धरणांमध्येही पाणीसाठा घटल्याने भरपावसात पाणीटंचाईचे संकट उभे राहिले होते. मात्र हवामान खात्याच्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार असून पाणी प्रश्न मिटण्याची आशा निर्माण झाली आहे.
कोकण, किनारपट्टीवर सरीवर सरी
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार कोकणात पावसाच्या सरीवर सरी बरसायला सुरुवात झाली आहे. शिवाय उल्हासनगर, बदलापूरमध्येही पावसाला सुरुवात झाली आहे. रायगडमध्येही पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे.
कोल्हापूर घाटमाथ्यावरही पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणांतील पाणी वाढत आहे. तर नाशिकच्या मालेगावमध्ये जळपू परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शिवाय शेतीची जमीन वाहून गेल्याने नुकसान झाले.
























































