
भाडेकरू पालिकेची जागा पैशाच्या मोबदल्यात अन्य व्यक्तीला हस्तांतरित करत असल्याचा दावा करत याचिका दाखल करणाऱ्या अर्जदाराला उच्च न्यायालयाने फटकारले. याचिकाकर्ता त्या ठिकाणी राहत नाही अथवा त्या जागेवर त्याचा अधिकार नाही असे असताना संबंधित याचिका कोणत्या आधारावर केली, असा सवाल करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
पालिकेच्या सिडेनहॅम कंपाऊंड, आय. आर. रोड येथील ब्लॉक क्र. 2 येथील सदनिकेत 1983 सालापासून सलमा बेग या राहत होत्या. सलमा बेग यांचे 2013 मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांचे पती अयुब शेख त्या जागेत राहत होते. भाडेकरारातील अटीनुसार ही जागा अन्य व्यक्तीला हस्तांतरित किंवा उपभाडय़ाने देता येत नाही. असे असताना शेख यांनी सलमा बेग यांच्या नावावरील ही जागा प्रतिवाद्यांना पैशाच्या मोबदल्यात विकण्यात आली असा दावा करत तबीश मिस्त्राr यांनी हायकोर्टात याप्रकरणी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, संबधित जागेशी आपला कोणताही संबंध नसून भाडेकरू हक्कही आपल्याला नाही. केवळ हस्तांतरणाला आपला विरोध असून पालिकेने महापालिका कायद्याच्या 105 बी अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयाने या युक्तिवादाची दखल घेत याचिकाकर्त्याला सुनावले.


























































