पंचशतकी आंतरराष्ट्रीय सामन्यात विराटची विक्रमाला गवसणी

हिंदुस्थानच्या विराट कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात  शतक झळकावणारा विराट हा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱया कसोटी सामन्यात विराटने पहिल्या डावात शतकी खेळी करून हा विक्रम आपल्या नावे केला. पाचशेव्या सामन्यात आतापर्यंत एकाही फलंदाजाने शतक सोडा, अर्धशतकही साजरे केलेले नाही. 

सध्या हिंदुस्थानी संघ वेस्ट इंडीज दौऱयावर असून दुसऱया कसोटी सामन्यात हिंदुस्थान पहिल्या डावात 4 बाद 315 धावा अशी सुस्थितीत आहे. हा सामना विराटचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. सलामीवीर बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या विराटने सुरुवातीला संयमी खेळ केला. त्यानंतर त्याने उत्तम फटके मारत धावांची गती वाढवली. त्याने सलग दुसऱया कसोटीत अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्याने आपल्या अर्धशतकाचे 29 व्या कसोटी आणि  76 व्या आंतरराष्ट्रीय शतकात रूपांतर केले.  रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर विराटने रवींद्र जडेजाच्या साथीने हिंदुस्थानच्या डावाला आकार दिला. विराटने आपले शतक 180 चेंडूंत 10 संयमी चौकरांसह पूर्ण केले.