हमासवर शेवटचा वार! इस्रायलने हवाई हल्ले वाढवले

हमासचा पूर्ण बीमोड करणारच या हट्टाने इस्रायलने आता गाझापट्टीतील राफाह शहरावर सैन्य घुसवण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी हवाई हल्लेही वाढवण्यात आले आहेत. इस्रायलने फर्मान सोडल्यानंतर राफाह शहरात दहशत पसरली असून पळापळ झाली आहे. येथे आश्रय घेतलेल्या सुमारे एक लाख लोकांनी पूर्व राफाहचा भाग सोडून लगेचच खान युनिस आणि अल-मवासी येथील मानवतावादी मदत छावण्यांच्या वाढीव क्षेत्राकडे तांडे निघाले आहेत. हमासला संपविण्यासाठी इस्रायल कोणत्याही क्षणी शेवटचा वार करण्याची शक्यता असून अमेरिका, संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी इस्रायलला विरोध केला आहे.

ही कारवाई तात्पुरती आणि मर्यादित असेल असे इस्रायलच्या सैन्याने म्हटले असले तरी हल्ले रविवारपासूनच सुरू झाले आहेत. रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यांत 19 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

अमेरिका, संयुक्त राष्ट्रांकडून विरोध

हमासला समूळ नष्ट करण्यासाठी रफाहवरील हा निकराचा हल्ला आवश्यक असल्याचे इस्रायलचे म्हणणे असले तरी अमेरिकेसह कुठल्याही मित्र देशाने इस्रायलला या हल्ल्यांसाठी पाठिंबा दिलेला नाही. संयुक्त राष्ट्रे आणि अनेक देशांसह स्वयंसेवी संस्थांनीही इस्रायलला हे पाऊल उचलू नये असे सुनावले आहे. राफामध्ये कार्यरत असणाऱया संयुक्त राष्ट्रांच्या स्वयंसेवी संस्थेनेही शहर न सोडता मदतकार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मदत छावण्यांमध्ये आधीच काही लाख लोक असताना नव्या लोकांमुळे तेथे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे.

एका लष्करी अधिकाऱयाने सांगितले की, त्यांनी मुवासीमध्ये फील्ड हॉस्पिटल, तंबू, अन्न आणि पाणी यासह मानवतावादी मदतीत वाढ केली आहे.

खेचरगाडय़ा, पायपीट करत निर्वासितांचे पुन्हा स्थलांतर

हमास-इस्रायल संघर्षात पोळलेल्या हजारो पॅलेस्टिनींनी आता या हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी खेचरगाडय़ांवर उरलेसुरले सामान लादून मदत छावण्यांचा मार्ग धरला आहे. अनेकजण सिलिंडर, तुटलेल्या सुटकेस आदी खेचत पायपीट करत छावण्यांच्या दिशेने निघाले आहेत. अनेकांनी मात्र आता आणखी किती स्थलांतर करायचे, पायपीट करायची असे म्हणत नाइलाजाने राफामध्ये आहेत तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी कुठे जाऊ, माझे कुटुंब कसे वाचवू…, असे काही महिला विचारत असल्याचे व्हीडीओ अल जझीरा वाहिनीवरून आज दाखवण्यात येत होते.

हल्ल्यात पॅलेस्टिनी 19 ठार

गाझामध्ये मानवतावादी मदत क्षेत्रासाठी मुख्य प्रवेशाचे ठिकाण असलेल्या केरेम शालोम सीमा क्रॉसिंगवर हमासच्या सैनिकांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यात चार इस्रायली सैनिक मारले गेल्यावर रविवारी रात्री रफाहमध्ये इस्रायलने जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यात 19 जण ठार झाले.

राफाहवर हल्ला का?

हमासच्या हल्ल्यानंतर गेले सात महिने गाझा पट्टीत इस्रायलने युद्ध सुरू ठेवले आहे. राफाह हा हमासचा शेवटचा बालेकिल्ला असून दहशतवाद्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी हे आक्रमण आवश्यक असल्याचे इस्रायलने वारंवार म्हटले आहे.