ऐन पावसाळ्यात रत्नागिरीकरांवर पाण्याचे संकट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण ते जॅकवेल दरम्यानच्या पाईपलाईनचे काम अद्याप झालेले नाही. सुमारे 1700 मीटरची ही पाईपलाईन आहे. हे काम वेळीच पूर्ण न झाल्यास भर पावसात रत्नागिरीवासियांना पाणीपाणी करावे लागेल. अशावेळी निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटाला रत्नागिरी नगरपरिषद जबाबदार असेल असा इशारा देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जॅकवेल ते धरण दरम्यानच्या पाईपलाईनचे काम त्वरीत झाले नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज रत्नागिरी नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसने असे म्हटले आहे की, शीळ धरणात गेली दोन वर्षे नवीन सुधारीत पाईपलाईनचे काम सुरु असूनही रत्नागिरीकरांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही जॅकवेल ते धरण हे पाईपलाईनचे काम झालेले नाही. सुमारे 1700 मीटरची ही पाईपलाईन आहे. हे काम पूर्ण न झाल्यास ऐन पावसाळ्यात रत्नागिरीकरांना पाण्यापासून वंचित राहावे लागेल.

तरंगती जेटी वाहून जाण्याचा धोका
पाणी खेचण्यासाठी उभारण्यात आलेली तरंगती जेटीसुध्दा पावसाळ्यात वाहून जाण्याची शक्यता असल्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने व्यक्त केली आहे. अशावेळी रत्नागिरी नगरपरिषदेने या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून तात्काळ धरण ते जॅकवेल दरम्यानची पाईपलाईन टाकून घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शहराध्यक्ष नीलेश भोसले, उपाध्यक्ष सनीफ गवाणकर, माजी नगरसेवक सईद पावसकर, बबन आंबेकर, उपाध्यक्ष रवी घोसाळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.