
शहरातील डॉ. सतीश पाटील यांच्या पायोस हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र, दुपारी कोल्हापूर येथील बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण तपासणी केल्यानंतर हा बॉम्ब नसल्याचे निष्पन्न झाले. ही वस्तू ठेवणारी व्यक्ती कोण, ती ठेवण्याचा हेतू काय, याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी दिली.
शनिवार, 19 मार्च रोजी एका व्यक्तीने डॉ. सतीश पाटील यांच्या पायोस हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर एक जेवणाच्या डब्याची पिशवी ठेवली होती. या पिशवीत वरच्या बाजूला डझनभर केळी होती. त्यामुळे ही पिशवी हॉस्पिटलमध्ये दाखल असणाऱया एखाद्या रुग्णाची असावी, असे समजून पायोस हॉस्पिटलच्या एका महिला कर्मचाऱयाने ती पिशवी रविवारी सकाळी हॉस्पिटलच्या आतील बाजूस ठेवली. मात्र, त्याच वेळी केळ्यांच्या खाली असणाऱया बॉम्बसदृश वस्तूला धक्का लागून त्यातील घडय़ाळाचा ‘बिफ बिफ’ असा आवाज येऊ लागल्याने ती घाबरली. तिने हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला याची कल्पना दिली. यानंतर व्यवस्थापनातील कर्मचाऱयांनी ही पिशवी हॉस्पिटलच्या पश्चिम दिशेस असणाऱया मोकळ्या जागेत फेकून देऊन जयसिंगपूर पोलिसांना संपर्क केला. जयसिंगपूर पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. पिशवीत घडय़ाळ आढळताच बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, सुमारे तीन तास तपासणी केल्यानंतर हा बॉम्ब नसल्याचे निष्पन्न झाले. याबाबत गुन्हा नोंद करण्याचे काम जयसिंगपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
अनर्थ टळला
n जयसिंगपूर येथील पायोस हॉस्पिटलमध्ये सांगली, कोल्हापूर जिह्यांसह कर्नाटकातूनही मोठय़ा प्रमाणात रुग्ण दाखल होत असतात. आजही येथे अनेक रुग्ण होते. हॉस्पिटलच्या आतील बाजूस ठेवलेल्या या डब्याच्या पिशवीत खरेच बॉम्ब अथवा स्फोटक वस्तू असती आणि तिचा स्फोट झाला असता, तर मोठय़ा प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली असती. मात्र, हा बॉम्ब नसल्याने अनर्थ टळला.































































