प्लॅस्टिकविरोधात नगर, कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर/कोल्हापूर

राज्यात प्लॅस्टिकबंदी झाल्यानंतर त्याचे सर्वत्र स्वागत होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाने कारवाई मोहीम हाती घेतली असून, आज नगर मनपाहद्दीत सहा दुकानांवर कारवाई करून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मनपाचे आरोग्य विभागाचे उपआरोग्य अधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांनी दिली. दरम्यान, नगरपालिका क्षेत्रामध्येही अशी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाकडे याची एकत्रित माहिती नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कोल्हापुरात बाजारात कापडी पिशव्या घेऊनच नागरिकांकडून वस्तू खरेदी करण्यावर भर देण्यात आला. आज दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या आरोग्य पथकाने चार व्यावसायिकांकडून सुमारे ४५० किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून प्रत्येकी पाच हजार असा एकूण २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

प्लॅस्टिकबंदीचे सर्वत्र स्वागत सुरू झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. काल शासनाने आदेश दिल्यानंतर नगर मनपाहद्दीमध्ये धडक कारवाई मोहीम हाती घेतली होती. आज बुरडगाव येथील प्रभागामध्ये सहा दुकानदारांकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळल्या. त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे दंड ठोठावण्यात आला.

प्लॅस्टिकबंदीचे स्वागत करून नागरिकांनी स्वतःहूनच कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कापडी पिशव्यांना मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भाजी मार्केट, तसेच कापड बाजारासह अन्य ठिकाणी कापडी पिशव्या उपलब्ध झाल्या आहेत. नगर शहरात मनपाहद्दीत मनपाने चारही प्रभागांत कारवाई करण्याचा आदेश उपायुक्त प्रदीप पठारे यांनी दिलेला आहे. आज सहा ठिकाणी दंडात्मक करवाई केली असली, तरी उद्या ही कारवाई तीव्र करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूरकरांनी शोधला प्लॅस्टिकला पर्याय कुकर, स्टिलच्या भांडय़ांतून आणले मटण

मांसाहाराचे चाहते असलेल्या कोल्हापूरकरांनी प्लॅस्टिकला पर्याय शोधला असून, आज रविवारी मांसाहाराचा बेत असलेल्या कुटुंबीयांनी अगदी डब्याबरोबरच कुकरमधूनही मटण, चिकन, मासे घेऊन जाणे पसंत केले. बाजारात कापडी पिशव्या घेऊनच नागरिकांकडून वस्तू खरेदी करण्यावर भर देण्यात आला. गेल्या दोन दिवसांत झालेल्या कारवाईत एकूण 13 व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून ६५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून, सुमारे एक टन प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत प्लॅस्टिक पिशवी बाळगल्याबद्दल एकाही नागरिकाला दंड करण्यात आलेला नाही.

आज दिवसभरात ‘हंसराज स्वीट्स’ (मंगळवार पेठ), ‘माधुरी बेकरी’ (बिंदू चौक), ‘गजानन बेकरी’ (उमा टॉकीज) आणि ‘जॅक ऍण्ड जिल’ (राजारामपुरी) या व्यावसायिकांवर कारवाई करून त्यांच्याकडील सुमारे साडेचारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्यांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. विभागीय आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.