नवविवाहितेच्‍या मृत्‍यूप्रकरणी पाचजणांवर गुन्‍हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील खोपडी या गावातील नवविवाहित तरुणी आरती शामहारी त्रिभुवन (20) हिचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळून आला. मयत आरती हीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असता मयत आरतीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. आरती हिच्या शरीरावर हातावर आणि डोक्यावर जखमा असल्याने तिला मारून विहिरीत टाकले असल्याचा आरोप करून आरतीच्या सासू सासरे,पती, दिर,यांना अटक करावी तोपर्यंत आम्‍ही शव ताब्‍यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. याची दखल घेत कोपरगाव ग्रामीण पोलीसांनी पाचजणाविरूध्द मृत्‍यूस कारणीभुत असल्‍याचा गुन्‍हा दाखल केला.

मकर संक्रांतीच्या सणासाठी मयत आरती हिचा भाऊ गणेश तिला आणण्यासाठी गेल्यानंतर आरती ही रविवारी सकाळी पासून बेपत्ता असल्याचे तिच्या सासरच्यांनी सांगितले. तसेच भावाला तिचा शोध घेण्यासाठी विहिरीकडे घेऊन गेले. विहिरीमध्ये आरतीच्या चपला आणि मोबाईल पाण्यावर तरंगताना दिसल्याने गळ टाकून तिला वर काढण्यात आले. आरतीच्या हातावर आणि डोक्यावर जखमा असल्याने तिला मारून विहिरीत टाकले असल्याचा आरोप मयत आरतीचे चुलते, भाऊ,आई हिने केला होता.

याप्रकरणी मयत आरती हिचा भाऊ गणेश आनंदा पठारे यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरून शामहरी चांगदेव त्रिभुवन नवरा, शिवहरी चांगदेव त्रिभुवन दिर, रामहरी चांगदेव त्रिभुवन दिर, चांगदेव त्रिभुवन सासरा व अंजनाबाई चांगदेव त्रिभुवन सासू या पाचजणाविरूध्द गुरनं. फर्स्ट 6 / 2019 भादंवी कलम 304 ब, 498 अ 504, 34 प्रमाणे कोपरगाव ग्रामीण पोलीसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रविणचंद्र लोखंडे यांच्‍या मार्गदर्शनखाली सपोनि अशिष शेळके करीत आहेत. गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर मंगळवारी रात्री 8 वाजता खोपडी येथे आरती हिच्यावर अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले.