
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
कोकणठाण येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र आपल्या भावाचा वीटभट्टयांना विरोध होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला. तसेच जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत मृताच्या नातेवाईकांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडले होते.संदीप भागवत रक्ताटे (36) असे मृताचे नाव आहे.
दरम्यान सायंकाळीसंदीप याच्या भावाने गणेशने पोलिसात तक्रार दाखल केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर संदीपचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत संदीप यांचे पश्चात पत्नी, दोन मुले ,आई वडील भाऊ भावजयी असा परिवार आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोकणठाण कांचनवाडी येथील संदीप याने साविल कंपनी शेजारील आव्हाड यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला टी-शर्ट व करदो-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांत मयताचे चुलत भाऊ चंद्रभान आसाराम रक्ताटे (35) गवंडीकाम, कांचनवाडी याने खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी 76/18भादंवी कलम 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र आपल्या भावाने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाला असल्याचा अर्ज संदीपचा भाऊ गणेश याने कोपरगाव पोलिसात दिला आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये मृताचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक गवसणे करीत आहेत.































































