
एकीकडे देशाला पहिले समलैंगिक न्यायाधीश मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे, याचवेळी दुसरीकडे हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या रेस्टॉरंटमध्ये समलैंगिकांना एण्ट्री दिली जात नसल्याचा आरोप झाला आहे. समलैंगिकांच्या एका ग्रुपने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा दावा केला आहे. त्यामुळे विराट वादाच्या भोवऱयात सापडला आहे.
विराटच्या ‘वन 8 कम्यून’ रेस्टॉरंटच्या पुणे, दिल्ली व कोलकाता येथे शाखा आहेत. या रेस्टॉरंटमध्ये समलैंगिकांना प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप ‘येस, वुई एक्झिस्ट’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करण्यात आला आहे. या दाव्यानंतर सोशल मीडियात विराटवर टीकेची फटकेबाजी सुरू झाली आहे. यावर विराटने प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र ‘वन 8 कम्यून’ने आम्ही लिंगाच्या आधारावर कुठलाही भेदभाव करीत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आमच्याकडे स्टॅग एण्ट्रीवर निर्बंध आहेत. हे केवळ आवारात उपस्थित असलेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी आहे, असे पुण्याच्या शाखेचे प्रमुख अमित जोशी यांनी सांगितले.































































