हवेची गुणवत्ता घसरली; पर्यावरणाला धोका, मालाडमधील कांदळवनांवर धोकादायक बेकायदा भराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या पी/उत्तर मालाड पश्चिममधील मढ-मार्वे ठिकाणच्या कांदळवनांवर बेकायदेशीरपणे आणि धोकादायकरीत्या मोठय़ा प्रमाणात भराव टाकून झोपडपट्टय़ा वसवल्या जात आहेत. त्यामुळे या ठिकाणचे कांदळवन नष्ट होत असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून हवेची गुणवत्ताही घसरली आहे. त्यामुळे या ठिकाणी बेकायदेशीर भराव टाकणाऱया समाजकंटकांवर तातडीने कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र पी/उत्तर विभागाकडून स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे.

मालाड पश्चिम येथील मढ-मार्वे भागात मोठय़ा प्रमाणात खारफुटीची जागा आहे. यामध्ये सुमारे 80 टक्के जागा जिल्हाधिकाऱयांच्या अखत्यारीत, 10 टक्के जागा म्हाडा तर 10 टक्के जागा पालिकेच्या अखत्यारीत आहे. या ठिकाणचे कांदळवन समुद्राचे पाणी मुंबईत शिरू नये आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी भरणी करून झोपडपट्टी वसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भरणीसाठीच्या मोठय़ा ट्रकमुळे मालाड भागातील रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असून वाहतूककोंडी होते. याबाबत पालिकेच्या पी-उत्तर विभागाने उपनगर जिल्हाधिकारी, परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त, म्हाडा व बीकेसीचे संचालक, कांदळवन कक्षाचे वन परिक्षेत्र अधिकारी, वन विभाग आणि तहसीलदार बोरिवली यांच्यासह मालवणी मालाड (प.), कुरार, मालाड (पू.) दिंडोशी, मालाड (पू.) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बोरिवली आणि वाहतूक नियंत्रण अधिकारी यांना पत्राद्वारे भरणी करणाऱयांवर कारवाईची मागणी केली.

…म्हणूनच पोलिसांकडून कारवाईची मागणी

z मालाड पश्चिममधील मढ-मार्वे हा परिसर खूप मोठा असून रात्री अपरात्री भरणी होत असल्यामुळे नियंत्रण करणे खूपच अवघड होते. तसेच भरणी झाल्यानंतर जागेवरची भरणी पुन्हा काढणे शक्य होत नाही, असे पालिकेने पत्रात म्हटले आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे वाहनावर फक्त दंड करण्याचा अधिकार आहे.
z इमारत व कारखाने विभागामार्फत खासगी ठिकाणावर होणाऱया अवैध भरणीबाबत पालिका अधिनियम, कलम 354 (ए) नुसार नोटीस दिली जाते. मात्र भरणी करणाऱया जागा मालकाचे नाव कळत नाही. तसेच नोटीस बजावूनही या ठिकाणावरील भरणीचे काम समाजकंटकांकडून थांबविण्यात येत नाही. या लोकांविरुद्ध पोलिसांमार्फत ‘एमपीडीए’ची कारवाई केल्यास या प्रकाराला आळा बसेल, अशी अपेक्षा पालिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे.