लॉकडाऊनमध्ये चितारली शेकडो जलरंग चित्रे, मंडणगडच्या प्रणय फराटेची कला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या या कठीण प्रसंगात आपल्या कुंचल्याच्या सहाय्याने निसर्गालाही बोलतं करण्याची किमया साध्य केली आहे ती  रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील वलवते गावातील युवा चित्रकार प्रणय प्रकाश फराटे याने. कोरोनामुळे सर्वत्र बंद असतांना कुंचल्याने जलरंगाचे अप्रतिम फराटे मारत प्रणयने एकापेक्षा एक अशा शंभर जलरंगांतील कलाकृती साकार केल्या आहेत.

pranay-farate-2

घरची परिस्थिती हलाकीची असतांनाही त्यावर जिद्दीने मात करत प्रणय सध्या सह्याद्री कला महाविद्यालयात कला शिक्षण घेत आहे. मंडणगड तालुक्यातील वलवते गावातून पायी जात त्याने प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बालपणीच मातृ छत्र हरपल्याने घरात आजी आजोबांना कामात मदत करुन त्याला शाळेत जावे लागे. प्रणयचे वडील प्रकाश फराटे हे कामानिमित्त मुंबईला असतात परिणामी आजी आजोबांच्या देखभालीची जबाबदारी प्रणयवर येवून पडली. मात्र हे सारे आनंदाने करत त्याने बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

pranay-farate-6

बालपणापासून चित्रकलेची असणारी आवड अखेरीस त्याला सह्याद्री कला महाविद्यालयापर्यंत घेऊन आली. कलाशिक्षण घेणे हे मोठे खर्चिक काम असल्याने प्रणयला हा खर्च करणे खूपच कठीण. मात्र जलरंग माध्यमाच्या विविध स्पर्धां मधून भाग घेत प्रणयने बक्षिसे मिळवत स्वतःच आपल्या शिक्षणाला हातभार लावला आहे.

pranay-farate-5

सह्याद्री कला महाविद्यालयात दोन वर्षांचा कलाशिक्षक पदविका कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रणयने रंग आणि रेखाकला शिक्षण घ्यायचे ठरवले.  आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असेल तर , जलरंगावर प्रभुत्व मिळवायला हवे असा निश्चय करुन प्रणय जलरंगात दररोज एक याप्रमाणे आजवर एक चित्र रेखाटत आला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात रमण्याची आवड असल्याने त्याच्या नजरेला निसर्गातील प्रत्येक घटक रेखाटनासाठी खुणावत असतो.

नजरेला निसर्गाचे जे दृष्य दिसते, त्यापेक्षा प्रणय जलरंगात जे रेखाटतो ते अधिक आनंद देणारे असते एवढी ताकद त्याच्या कुंचल्यात निर्माण झाली आहे.

pranay-farate-2

लॉकडाऊनच्या कालावधीत काहीतरी वेगळे करावे या इराद्याने प्रणयने गेल्या 25 दिवसात जवळपास शंभर कलाकृती साकारल्या आहेत. कोकणचा निसर्ग रसिकांनी कलाकाराच्या नजरेतून पहावा आणि निसर्गातील अद्भूत दृष्ये पहायला मिळावीत याबरोबरच कलाकाराला कशा कशा मध्ये सौंदर्य दिसत असते , हे देखील रसिकांना पहायला मिळावे हा आपला चित्र रेखाटना मागील उद्देश असल्याचे प्रणय याने सांगितले.

9

या सर्व कलाकृतींचे लवकरच प्रदर्शन भरविण्याचा आपला मानस असल्याचे प्रणय फराटे याने सांगितले. प्रणयची जलरंग चित्रे ज्यांना घ्यायची असतील त्यांनी प्रणयच्या 7507981994 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा  असे आवाहन करण्यात येत आहे.