राष्ट्रवादी काँग्रेस फोडणं शक्य नाही; रोहित पवारांनी भाजपला ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपने शिवसेना फोडून सत्ता स्थआपन केली. आता त्यांचे पुढचे लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतो, असे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे त्यांना शक्य नसल्याचेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर आता भाजपचे पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. शिवसेना मोठा पक्ष आहे. त्याच्या नेत्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणत, राजकारण करत तो पक्ष फोडण्यात आला. आता त्यांचे दुसरे टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असू शकते कारण शिवसेनेनंतर दुसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी आहे, असो रोहित पवार म्हणाले.

त्यांचे टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे शक्य नाही. कारण शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे चालत आहोत.एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे कितीही प्रयत्न केले, तरी त्यांना यश येणार नाही. पण ज्यांना लोकशाही माहीत नाही. दडपशाही, फोडाफोडी माहिती आहे, त्यांचं दुसरं टार्गेट कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस असेल. कारण तोच दुसरा मोठा पक्ष आहे, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. आमची सर्वांची उद्दिष्ट स्पष्ट आहेत. सुप्रिया सुळेंना लोकसभेत, अजित पवारांना आणि मला राज्यात सध्या जे करत आहोत, तेच काम करण्याची इच्छा आहे. पण विरोधकांनी ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रमाणे त्यांना आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं विरोधकांना वाटत आहे. शिवसेनेनंतर आम्ही पुढील टार्गेट असू शकतो, असे रोहित पवार म्हणाले होते.