
राज्यातील ‘ईडी’ सरकारचे काम कमी आणि घोषणा, प्रसिद्धीच जास्त, असा टोला लगावत आगामी विधानसभा निवडणुकीत पाथर्डीचा आमदार हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच असेल, असा ठाम विश्वास नगर जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सुनील शिंदे यांनी व्यक्त केला.
पाथर्डी तालुक्यातील कारेगाव, मोहटे, चिंचपूर इजदे, करोडी, तिनखडी, भिलवडे, पिंपळगाव तप्प्पा, चिंचपूर पांगुळ, वडगाव, जोगेवाडी या गावांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखांचे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जोगेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार शिंदे बोलत होते. नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख शिवाजी काटे, पाथर्डी तालुकाप्रमुख भगवानराव दराडे, रावजी नांगरे, पुष्पा गर्जे, अशोक गायकवाड, राजेंद्र म्हस्के, अमोल जायभाये, भाऊसाहेब धस, महादेव रहाटे, शायद पठाण, दत्ता दराडे, शिवाजी कंठाळे, मीरा बडे, सविता पवार, संजय गोल्हार, अंकुश आव्हाड, नवनाथ उगलमुगले, आदर्श काकडे उपस्थित होते.
आगामी काळ हा फक्त शिवसेनेचाच आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचाच वरचष्मा राहील ही काळ्य़ा दगडावरची रेघ आहे, असे सांगून आमदार शिंदे म्हणाले, राज्यातील ‘ईडी’ सरकार प्रसिद्धीसाठी घोषणाच जास्त करीत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील जनता शिवसेनेसोबत असल्याचे निकालावरून दिसून आले. राज्यातील जनता आजही महाविकास आघाडी सोबतच आहे, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी प्रोत्साहन अनुदान योजनेत नगर जिल्हय़ातील एक लाख एकतीस हजार शेतकरी लाभापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी आक्रमक आंदोलन करून मोर्चा काढावा लागणार आहे. या शेतकऱयांना न्याय मिळवून देण्यासाठी खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी तयार राहा, असे आवाहनही आमदार शिंदे यांनी केले.
तालुकाप्रमुख भगवानराव दराडे यांनी प्रास्ताविक केले. सुखदेव मर्दाने यांनी सूत्रसंचालन, तर माजी शहरप्रमुख भाऊसाहेब धस यांनी आभार मानले.































































