Mumbai crime news – मुलाच्या विक्रीच्या आरोपाखाली पित्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक फायद्यासाठी पित्याने त्याच्या एका वर्षाच्या मुलाची विक्री केल्याची घटना धारावी परिसरात घडली. घडल्या प्रकरणी धारावी पोलिसांनी तीन जणा विरोधात गुन्हा नोंद करून मुलाच्या पित्याला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हा सुरक्षा रक्षक असून तो मुलाचा मामा आहे. मुलगा हा त्याच्या आई वडिलांसोबत धारावी येथे राहतो. 6 ऑगस्टला मुलाच्या मामाला फोन आला. मुलगा पावसात पाय घसरून पडला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदार हे सायन रुग्णालयात गेले. तेथे त्याने शोध घेतला. तक्रारदार याने मुलाच्या आई वडिलांना फोन केले. मात्र ते दोघे फोनला प्रतिसाद देत नव्हते.

काही वेळाने तक्रारदार हे मुलाच्या घरी गेले. तेव्हा मुलाच्या आईने त्याला मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असे सांगितले. मुलाचे शवविच्छेदन होत असताना ते दोघे घरी असल्याने तक्रारदार याना संशय आला. त्याने त्या दोघांना जाब विचारला. त्यानंतर दुसऱया दिवशी तक्रारदार हे मुलाच्या घरी गेले. त्याने पुन्हा विचारणा केली. तेव्हा मुलाच्या आईने त्या मुलाला एका महिलेस एक लाख रुपयास विक्री केल्याचे सांगितले. पैशाच्या मोबदल्यात ती महिला मुलाचा सांभाळ करणार असे सांगितले. घडल्या प्रकरणी तक्रारदार याने धारावी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तीन जणा विरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.