मेट्रो वनच्या प्रवाशांना आता व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार ट्रिप पास, तिकीट खिडकीवरील रांगेतून सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनचे प्रवासी थेट व्हॉट्सअॅपद्वारे ट्रिप पास आणि स्टोअर व्हॅल्यू पास खरेदी करू शकणार आहेत. मेट्रो वनच्या प्रशासनाने डिजिटल पासची सुविधा उपलब्ध केली आहे. गुगल वॉलेट आणि अॅपल वॉलेटवर डिजिटल पाससह उपलब्ध असणारा हा देशातील पहिला मेट्रो पास ठरला आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना आता तिकीट खिडकीवरील रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

मुंबई मेट्रो वनच्या प्रवाशांना डिजिटल पासच्या आधारे दैनंदिन तिकीट काढण्यासाठी आधीपासून वापरत असलेल्या व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मद्वारे मल्टी-ट्रिप पास आणि स्टोअर-व्हॅल्यू प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. प्रवाशांना त्यांचा मेट्रो पास पूर्णपणे डिजिटल पद्धतीने खरेदी करून सोबत बाळगता येणार असून प्रत्यक्ष कार्डची गरज राहणार नाही. डिजिटल पास गुगल वॉलेट वा अॅपल वॉलेटमध्येही जोडता येतो. प्रवासी मुंबई मेट्रो वनला 9670008889 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपवर `Hi’ पाठवून डिजिटल पासच्या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.