तुकाराम मुंढेंच्या कारवाईला वेग; मुंबईतील सहा हॉटेल्स, क्लबचे परवाने निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एफडीएचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईकरांना खराब अन्न खाऊ घालणाऱ्या हॉटेल्स आणि क्लबच्या नाकीनऊ आणले आहेत. खराब अन्नपदार्थ व अस्वच्छतेच्या कारणास्तव सहा नामांकित हॉटेल्स आणि क्लबचे अन्न परवाने निलंबित केले आहेत.

एफडीएने वांद्रे कार्टर रोडवरील ऑटर्स क्लबवर धाड घातली तेव्हा तिथे तपासणीत अनालॉग पनीर वापरले जात असल्याचे आढळले. दहिसर येथील डेली फ्रेश ब्रेकर्स आणि केक्स या दुकानात केकसाठी वापरण्यात येणारा खाद्य रंग मुदतबाह्य आढळला. खार येथील मेसर्स प्रिन्स ऑफ वेल्स रेस्टॉरंटमध्ये अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन आढळल्याने रेस्टॉरंटचे नोंदणी प्रमाणपत्रच निलंबित करण्यात आले. मुदतबाह्य अन्नपदार्थांची योग्य विल्हेवाट न लावल्याने विलेपार्ले येथील राज ऑईल ट्रेडिंगचा परवाना निलंबित करण्यात आला. अंधेरी मरोळ येथील पॅफे सिफारीशमध्ये कर्मचाऱ्यांना हात स्वच्छ धुण्यासाठीही पुरेशी व्यवस्था नसल्याचे आढळले तर चेंबूरमधील झेप्टोच्या गोदामात अन्नपदार्थ अस्वच्छ ठिकाणी ठेवलेले आढळले.

शीतपेयांचा साठा जप्त केल्याप्रकरणी हायकोर्टाने फटकारले

उत्पादनाचे मिसब्रँडिंग केल्याच्या आरोपावरून कंपनीचा कोटय़वधींचा शीतपेयांचा साठा जप्त करणाऱ्या एफडीएला मुंबई हायकोर्टाने आज फैलावर घेतले. एफडीएने संबंधित पंपनीला अन्न विश्लेषण अहवाल दिला नसल्याचे उघडकीस आल्यानंतर हायकोर्टाने एफडीएला जाब विचारला. ठाण्यातील जेएनटीएल कन्झ्युमर हेल्थ या पंपनीने शीतपेयाचे मिसब्रँडिंग केल्याचा ठपका ठेवत एफडीएने शीतपेयांचा साठा जप्त केला.