नागपूर – बिबट्याच्या हल्ल्ययत चिमूकला ठार

leopard

व्यायामासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. ही घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील ब्रम्हपुरी उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्‍या चिचगाव कक्ष क्रमांक 1010 मध्ये घडली. नैतिक संतोष कुथे असे मृतकाचे नाव आहे.

कोरोना महामारीमुळे शाळा बंद असून, आभासी शिक्षण सुरू आहे. त्यामुळे सकाळी 5 वाजताच्या सुमारास गावखेड्यातील शाळकरी मुले सकाळचा व्यायाम करण्यासाठी गावापासून पाच ते दहा किलोमिटर अंतरावर जातात. असेच चिचगाव येथील मुले डोर्ली मार्गाने धावत होते. गावापासून काही अंतरावर नैतिकच्या चपलेचा पट्टा तुटला. त्यामुळे तो खाली वाकला. क्षणात झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घेतली. त्याला उचलून झुडपी जंगलात नेले. सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड करून बिबट्याने दिशेने धाव घेतली. पण, बिबट्याने त्यास बर्‍याच अंतरापर्यंत नेले होते. त्यामुळे अन्य मुलांनी गाव गाठले. घडलेली घटना ग्रामस्थांना सांगितली. गावकरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोध घेतला असता, नैतिकचा मृतदेहच हाती लागला. घटनेची माहिती वनविभाग व पोलिस विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस अधिकारी व वनविभागाची चमू घटनास्थळी गेले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी येथे पाठवला. मृताच्या नातेवाईकास आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन वनाधिकार्‍यांनी यावेळी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या