
सामना प्रतिनिधी। नगर
राज्य मंत्रिमंडळ उपसमितीने राज्यभरातील आणखी 931 गावांत दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये अकोले तालुक्यातील 116 गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी गावांची संख्या आता 1 हजार 421 वर गेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा 90 टक्के भूभाग यंदा दुष्काळाने व्यापला गेला आहे.
महाराष्ट्र शासनाने 23 ऑक्टोबरमध्ये 11 तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली . अकोले. कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यांना पाऊस समाधानकारक झाल्याचे सांगून, दुष्काळापासून वंचित ठेवले गेले. दिवाळीच्या आसपास शासनाने मंडलनिहाय दुष्काळ जाहीर केला. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका व श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या दोन महसुली मंडलांचा समावेश केला.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाने खरीप हंगाची अंतिम पैसेवारी 15 डिसेंबरमध्ये जाहीर केली. अकोले तालुक्यातील सर्वच 191 गावे खरीप हंगामात मोडतात. या सर्वच गावांची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली. शासनाच्या दृष्टीने सुकाळ असणार्या या तालुक्यातील सर्वच गावांची पैसेवारी कमी आली. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जनतेकडून जोर धरु लागली. खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर, शासनाने कमी पैसेवारी आणि कमी पाऊस असणार्या मंडलाचा अहवाल तात्काळ पाठविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने अकोले तालुक्यातील पाच महसुली मंडलांचा अहवाल शासनाकडे पाठविला होता.
शासनाने चार-पाच दिवसांपूर्वीच नव्याने 931 गावांत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली. यामध्ये अकोले तालुक्यातील अकोले मंडलातील 20,वीरगाव मंडलातील 18, समशेरपूर 25 , कोतूळ मंडलातील 29 व ब्राम्हणवाडा मंडलातील 24 अशा एकूण 116 गावांचा समावेश आहे. शासनाने उशिराका होईना 116 गावांत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या गावांना दुष्काळी सवलती लागू होणार आहे.
































































