
सामना प्रतिनिधी। नागपूर
लहान मुलं काय खातात, ते कोणत्या वस्तू तोंडात घालतात, याकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून काळजी घेण्याची गरज आहे. कारण नागपुरात नुकत्याच घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन चिमुकल्यांना जीव गमवावा लागला आहे. येथे फुगा श्वासनलिकेत अडकल्याने सानिध्य उरकुडे (6) या मुलाचा मृत्यू झाला तर आवश्यकतेपेक्षा जास्त केळे खाल्ल्याने तिथी मिश्रा या अडीच वर्षाच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे.
सानिध्य घराच्या आवारात फुग्यांसोबत खेळत होता. 25 जानेवारीला त्याने तीन फुगे खरेदी केली. दोन फुगे आईने फुगवून दिले. तर संध्याकाळी तिसरा फुगा फुगवण्याचा प्रयत्न केला. पण तो फुटलेला असल्याने त्याने फुग्यापासून छोटा फुगा बनवणं सुरु केलं. त्याच प्रयत्नात, जोरात श्वास घेतल्याने तो फुगा त्याच्या तोंडातून घशात गेला आणि श्वासनलिकेत अडकला. त्रास झाल्याने चिमुकल्या सानिध्यने घरात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
दुसरी घटनाही नागपुरातलीच आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर-भंडारा रोडवर पारडी परिसरात घडली. अडीच वर्षांची तिथी नेहमीप्रमाणे शेजारच्यांच्या घरी खेळायला गेली. घरात पूजा झाल्यावर त्यांनी प्रसादाचं केळं कुटुंबातील मुलांना आणि तिथीला खायला दिली. मात्र, केळ्याच्या आकाराचा आणि स्वतःच्या क्षमतेचा अंदाज न आल्यामुळे तिथीने ते केळं आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं. पण केळ्याचा तो घास तिच्या श्वासनलिकेत अडकला. तिथीचा त्रास पाहून शेजाऱ्यांनी तिच्या तोंडातून केळं काढण्याचा प्रयत्न केला. ते शक्य न झाल्याने त्यांनी तिथीच्या आई-वडिलांना याबाबत कळवलं. मात्र तोपर्यंत चिमुकल्या तिथीचा जीव गेला होता.

































































