
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करून वाशी येथील प्रथम संदर्भरुग्णालयात बसवलेली एमआरआय मशीन उद्घाटनाविना धूळखात पडून आहे. नेत्यांना वेळच मिळत नाही, त्यातच पुन्हा विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे उद्घाटन लांबणीवर पडल्याने रुग्णांची फरफट सुरू झाली आहे. एमआरआयची आवशकता असलेले रुग्ण दररोज वाशी रुग्णालयात खेटे मारत आहेत.
खासगी रुग्णालयांत किंवा सेंटरमध्ये एमआरआय करणे फार खर्चिक आहे. या खर्चातून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने वाशी येथील प्रथम संदर्भरुग्णालयात एमआरआय मशीन बसवली. त्यामुळे रुग्णांना दीड हजार रुपयांत एमआरआय काढता येणार आहे. मात्र एमआरआय मशीन आणि या दालनाचे उद्घाटन करण्यासाठी सत्ताधारी नेते मंडळींना वेळ मिळाला नाही. आता तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही लागली आहे. त्यामुळे ही मशीन अद्यापपर्यंत धूळखात पडून आहे. एमआरआय करण्यासाठी या रुग्णालयात दररोज रुग्ण येतात. मात्र मशीन बंद असल्यामुळे त्यांना परत जावे लागत असून खासगी सेंटरमध्ये महागड्या दरात एमआरआय करावे लागत आहे. फक्त उद्घाटनामुळे एमआरआय सेवेची रखडपटी झाल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.
… तर तीव्र आंदोलन छेडणार
एमआरआय मशीन तातडीने सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि प्रवीण म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी रुग्णालय अधीक्षकांची भेट घेतली. या प्रसंगी बेलापूर विधानसभा प्रमुख अतुल कुळकर्णी, रंजना शिंत्रे, जिल्हासंघटक, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, मनोज इसवे, सुमित्रा कडू, एकनाथ दुखंडे, शत्रुघ्न पाटील, महेश कोठिवले, नगरसेवक विशाल ससाणे, विशाल विचारे, उपशहर प्रमुख समीर बागवान, नरेश चाळके, संदीप पाटील, विभाग प्रमुख प्रकाश ओंबळे, भोईर, शाखाप्रमुख दिलीप चरवड, उपशहर संघटक अपर्णा दुराफे आदी उपस्थित होते. दोन दिवसांत एमआरआय सेवा सुरू झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि प्रवीण म्हात्रे यांनी दिला


























































