वेब न्यूज :  वन्य जीवांच्या प्राणरक्षणासाठी नवे तंत्रज्ञान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातच वन्य जीवांच्या होणार्‍या हत्या हा मोठा चिंतेचा  विषय बनला आहे. अनेक कारणांनी वन्य जीवांच्या अनेक जाती जगभरातच धोक्यात येत आहेत किंवा नामशेष झाल्या आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. या सगळ्यात प्राण्यांची शिकार हे सर्वात मोठे कारण आहे. अशावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या प्राण्यांच्या जीवरक्षणासाठी काही उपाय करता येतील का यावर अनेक प्राणीशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ काम करत आहेत.

वन्य जीवांची शिकार ही मुख्यतः त्यांच्या विविध अंगांसाठी जसे की, दात, शिंगं, नखं इत्यादींसाठी केली जाते. अशावेळी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर वॉलरथ यांनी सरळ प्राण्यांची कृत्रिम अंगेच तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करायचा उपाय सुचवला आहे. त्यांनी हत्तीच्या कृत्रिम दाताची निर्मितीदेखील केली आहे. कोलॅजन आणि खनिज यापासून हे कृत्रिम दात बनवण्यात आले आहेत, तर पेबिएंट नावाची कंपनी गेंड्याचे कृत्रिम शिंगं बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. लिव्हरपूलमधील जॉन मूर्स युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिक क्लेयर बर्क ‘जूनीवर्स’ नावाच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. यामध्ये जनावरांच्या शरीरातून निघणार्‍या उष्णतेच्या मदतीने त्यांचे संरक्षण केले जाणार आहे. विशिष्ट प्रकारच्या कॅमेर्‍याची निर्मिती करून हे कॅमेरे प्राण्यांवर लक्ष ठेवण्याच्या कामावर नेमले जातील. हे कॅमेरे प्राण्यांच्या मागावर असतील आणि कुठल्याही धोक्याची जाणीव झाल्यास ताबडतोब अलार्म वाजवतील. ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या बोटांचे ठसे वेगळे असतात, अगदी तशाच प्रकारे प्रत्येक प्राण्याच्या शरीरातून निघणार्‍या उष्णतेचे तापमानदेखील वेगवेगळे असते हे विशेष. हिंदुस्थानी वंशाचे मिलिंद तांबे तर सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या मदतीने आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने वन्य जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. मिलिंद तांबे यांनी 2013 मध्ये युगांडाच्या वन्य जीव संरक्षण अधिकार्‍यांच्या मदतीने क्वीन एलिझाबेथ नॅशनल पार्कमध्ये केलेली निरीक्षणे यासाठी महत्त्वाची ठरत आहेत. शिकार झालेल्या प्राण्यांचे अवयव, शिकार्‍यांनी लावलेली जाळी, शिकारीची ठिकाणे अशा सगळ्याचा अभ्यास करून एक मॉडेलवर काम चालू आहे, ज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने पुढील शिकार कोणत्या प्राण्याची होऊ शकते याचा अंदाज लावणे शक्य होणार आहे.