
चेंबूरमध्ये स्कूलबसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाने जाहीर केलेला अहवाल महापौर रितू तावडे यांनी फेटाळून तातडीने फेरतपास करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले. मात्र दोन आठवडे उलटले तरी या दुर्घटनेची फेरतपासणी अहवालाचा पत्ताच नसून नव्याने कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रशासनाकडून तातडीने आढावा घेतला जाईल, अशी माहिती महापौर रितू तावडे यांनी आज दिली.
चेंबूर दुर्घटनेत पिंपळाचे झाड कोसळून 11 वर्षीय विहानचा मृत्यू झाला होता. या दुर्घनेनंतर चौकशी समितीच्या अहवालानंतर संबंधित कंत्राटदाराला पाच लाख तर सल्लागाराला दोन लाख रुपये तुटपुंजा दंड आकारून उद्यान व रस्ते विभागावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
महापौर-प्रशासनाच्या माहितीत तफावत
चौकशी समितीच्या अहवालानंतर कंत्राटदार, सल्लागाराला दंड आकारून पालिकेच्या तीन अधिकाऱयांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. या अधिकाऱयांचे निलंबन अद्याप मागे घेण्यात आलेले नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र महापौर रितू तावडे यांनी मात्र महासभेनंतर संबंधित अधिकाऱयांचे पुन्हा निलंबन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.






























































