नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांच्या मुलाने म्हणजेच सत्यजीत तांबे याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. हा प्रकार काँग्रेसला अजिबात आवडलेला नसून पक्षाने सुधीर तांबे यांना निलंबित केलं आहे. या घडामोडींमुळे नाशिक मतदारसंघात मविआचा उमेदवारी कोण असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे. याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मविआची बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच काँग्रेसमध्ये होणाऱ्या या प्रकाराची कुणकुण आपल्याला लागली होती व त्याबाबत आपण काँग्रेसच्या नेत्यांना सावध केलं होतं, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.
”काँग्रेस पक्षाने डॉ. तांबेची उमेदवारी जाहीर करून देखील त्यांनी फॉर्म न भरल्याने हे प्रश्न निर्माण झाले आहेत. नागपूर व अमरावती या दोन स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रश्न राहिला होता. मात्र तांबेंनी फॉर्म न भरल्याने आता नाशिक मतदारसंघाचा प्रश्न निर्माण झाला आहेत. डॉ.सुधीर तांबे हे गेली तीन टर्म या मतदारसंघातून निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा करण्याची गरजच नव्हती. मात्र घरातच कदाचित त्यांची काही चर्चा झाली असेल त्यामुळे शेवटच्या क्षणी सत्यजितचा अर्ज आला. या गोष्टीची मला कुणकुण लागली होती. मी ती गोष्ट काँग्रेस वरिष्ठांच्या कानावर घातली होती. त्यांना हे देखील सांगितलेलं की तुम्ही काळजी घ्या. नाहीतर तुम्ही अधिकृत डमी फॉर्म भरून ठेवा”, असे अजित पवार यांनी सांगितले.
डॉ. तांबेंनी असं का केलं हे नक्की विचारणार
”काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने फॉर्म न भरल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर काँग्रेसने सुधीर तांबेवर कारवाई केली. काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्यात उगीच महाविकास आघाडीचं नाव गोवू नका. अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून खरं काय झालं ते समजून घेतलेलं बरं असतं. मी आणि डॉक्टर तांबे गेली 15 वर्ष एकत्र काम करत आहोत. मी देखील त्यांना विचारू शकतो की त्यांनी असं का केलं. पण हे फोनवर बोलता येत नाही. समक्ष भेटल्यावर मी त्यांना नक्की विचारेन”, असे अजित पवार यांनी सांगितले.
दावोसमध्ये गेलेल्या मंत्र्यांनी आत्मपरिक्षण व आत्मचिंतन करावं
सरकारमधून उदय सामंत व एकनाथ शिंदे हे दावोसला गेले आहेत. त्यांनी जेवढा राज्याचा फायदा करता येईल तेवढा करून घ्यावा मात्र त्यासोबत आत्मचिंतन व आत्मपरिक्षणही करावं. आपल्यातले काही लाख कोटी रुपयांचे प्रकल्प बाहेर जाऊ देणं व लाखो मुलींना व मुलींना नोकऱ्यांपासून वंचित ठेवणं ही अत्यंत वाईट गोष्ट त्यांच्याकडून घडलेली आहे. हे त्रिवार सत्य आहे. ते नाकारू शकत नाही. त्यामुळे आता तरी त्यांनी महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करावा. महाराष्ट्राचं भलं होत असेल तर आम्ही विरोधी पक्षात असलो तरी त्याचं स्वागतच करणार, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

































































