जॉर्जनी धोतर-फेटा घालून पोलिसांना चकवले! पैठणमधील वेषांतराची जुनी आठवण

67

बद्रीनाथ खंडागळे । पैठण

माजी संरक्षणमंत्री जाँर्ज फर्नांडिस यांचे निधन झाल्याची वार्ता आली अन् त्यांच्या पैठणभेटीला ऊजाळा मिळाला. आणीबाणीत 1975 साली भूमीगत असताना त्यांनी इतिहास संशोधक कै. बाळासाहेब पाटील यांच्या पैठणच्या वाड्यावर मुक्काम ठोकला होता. दुसऱ्या दिवशी पाटलांनी त्यांचे धोतर-फेटा घालून वेषांतर केले आणि चक्क दुचाकीवरून त्यांना पाचोड येथे सोडले. तेथून बसचा प्रवास करत त्यांनी कर्नाटक गाठले. अशी मजेशीर तेवढीच थरारक माहिती कै. पाटील यांचे पुत्र जयवंत पाटील यांनी ‘दै. सामना’शी बोलताना दिली.

25 जून 1975 रोजी देशभर आणीबाणी लागू करण्यात आली होती. अनेक नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. जहाल कामगार नेते जाँर्ज फर्नांडिस हे मात्र अटकेपुर्वीच भुमिगत झाले होते. फेब्रुवारी 1976 मध्ये ते सिल्लोड मार्गे संभाजीनगरला पोहोचले. तेथे त्यांनी रणदिवे नावाच्या कार्यकर्त्याची भेट घेतली. संभाजीनगर पोलीस सतर्क असल्याचे समजल्यावर त्यांनी पैठणच्या बाळासाहेब पाटलांकडे जाण्याचा निर्णय घेतला. रणदिवे या कार्यकर्त्यांसोबतच ते रात्री उशिरा पैठणला पोहोचले. रात्रीच्या पोलीस गस्तीचा अंदाज घेतला आणि ती रात्र दोघांनी पैठण बसस्थानकाच्या तत्कालीन लाकडी बाकड्यावर काढली.

भल्या पहाटे कै. बाळासाहेब पाटील यांच्या वाड्यावर दोघे पोहोचले. तेथे पाहुणचार घेऊन दुसऱ्या दिवशीही मुक्काम ठोकला. त्यानंतर सकाळी कै. पाटलांनी त्यांचे वाड्यावरच वेषांतर करून टाकले. स्वतःची धोतर नेसवली आणि फेटाही बांधला आणि चक्क “राजदूत” दुचाकीवरून पाचोड येथे सोडले होते. पाचोड हे गाव संभाजीनगर-बीड महामार्गावर आहे. तेथून एसटी बसचा प्रवास करत त्यांनी कर्नाटक राज्यात प्रवेश केला होता, अशी आठवण जयवंत पाटील यांनी सांगितली. पुढे 10 जून 1976 रोजी फर्नांडिस यांना अटक झाली. तथापि एकदा संरक्षण मंत्री असताना संभाजीनगला ते आले होते. त्यावेळी गर्दीतून त्यांनी बाळासाहेब पाटील यांना पाहिले आणि जवळ जाऊन मिठी मारली होती, असेही जयवंत पाटील यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या