एक तरी वडाचे झाड लावा, सुशीलादेवी सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरणपूरक निसर्ग निर्माण करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना समृद्ध वारसा देण्यासाठी एक तरी वडाचे झाड लावा असा संदेश सुशीलादेवी सोशल वेल्फेअर फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने देण्यात आला आहे. संस्थेचे संस्थापक संतोष जाधव यांनी महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमधील नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 

संतोष जाधव यांनी पुढील दहा पिढ्यांसाठी पर्यावरणपूरक संदेश देत प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव, वस्ती आणि विभागांमध्ये उपलब्ध जागेनुसार वृक्षारोपण करण्याचा विचार मांडला आहे. ज्या नागरिकांकडे जागा उपलब्ध नाही त्यांनी वाढदिवस, स्मरण दिन किंवा स्मृतीप्रीत्यर्थ भेट म्हणून एखाद्या प्लॅस्टिकच्या कुंडीत किंवा पिशवीत वडाच्या झाडाची फांदी लावून ते चार ते पाच फूट वाढेपर्यंत सांभाळा. त्यानंतर मंदिर परिसर, गावातील मोकळी जमीन किंवा वनक्षेत्र अशा सुरक्षित ठिकाणी त्याचे पुनर्रोपण करावे असा विचार त्यांनी मांडला आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात किमान एकदा वडाचे झाड लावून ५०० वर्षांचे पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

 

वृक्षारोपणामुळे हे फायदे
वृक्षारोपणामुळे प्राण्यांचे संवर्धन होऊन त्यांना सुरक्षित नैसर्गिक घर मिळेल. या निसर्ग निर्मितीमुळे संपूर्ण परिसराला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा शुद्ध ऑक्सिजन आणि हजारो घन लिटर शुद्ध पाण्याचा स्रोत उपलब्ध होईल. तसेच पालापाचोळ्यापासून नैसर्गिक खत तयार होऊन मातीचे सूर्याच्या प्रखर उन्हापासून रक्षण होईल अशी माहिती जाधव यांनी दिली.

अधिक माहितीसाठी संपर्क: ९००४४३८६६८.