आम्ही साहेबांसोबतच… शिवसैनिकांचा निर्धार! आदित्य ठाकरे यांचा शाखाशाखांतून शिवसैनिकांशी थेट संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘निष्ठा यात्रे’ला आजपासून सुरुवात झाली. या यात्रेमध्ये आदित्य ठाकरे हे शिवसेना शाखांना भेटी देऊन शिवसैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. आज त्यांनी माझगाव आणि वरळी येथील शाखांना भेटी दिल्या. यावेळी शिवसैनिकांनी वज्रमूठ उंचावत ‘आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहू’ असा निर्धार व्यक्त केला.

आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केली तरी शिवसैनिक मात्र आजही शिवसेनेसोबत कायम आहेत. त्या शिवसैनिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे माझगाव येथील शाखा क्रमांक 216 येथे पोहोचले तेव्हा शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत त्यांनी घात केला, असे याप्रसंगी आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांबाबत बोलताना म्हणाले. यावेळी आमदार गेले तरी शिवसैनिक आजही शिवसेनेसोबत कायम आहेत, असे शिवसैनिकांनी त्यांना सांगितले. 

‘मागील दोन-अडीच वर्षांत जे काही काम झाले ते जनतेने पाहिले आहे. ज्यांच्यावर विश्वास टाकला, ज्यांना आम्ही सर्व काही दिले त्यांनीच आम्हाला धोका दिला, असा संताप व्यक्त करतानाच आदित्य ठाकरे यांनी, मतदारांनी चिन्ह पाहून निवडून दिलेले आमदार फुटतात म्हणजे देशात लोकशाही आता राहिली आहे का? अशी खंतही यावेळी व्यक्त केली. 

वरळी येथील शाखांमध्येही आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत झाले. गेली अडीच वर्षे कोणावरही टीका न करता राज्यातील जनतेची सेवा केली म्हणूनच हे प्रेम मिळत आहे असे सांगत आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांचे आभार मानले. लोकांचा आशीर्वाद आणि प्रेम घेण्यासाठीच ही यात्रा सुरू केल्याचे ते म्हणाले. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि महिला आघाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.