
सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बटाटा उत्पादन घेतले जाते. मात्र उत्पादक शेतकर्यांना मार्गदर्शन जलद मिळत नसल्याने त्यांचे अनेकदा नुकसान होते. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात बटाटा संशोधन केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न केला जात आहे. सध्या शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
सातारा जिल्ह्यात कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर, फलटण आदी तालुक्यात बटाटा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने याबाबत जिल्हा परिषद कृषी समितीने ठराव करुन महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) यांच्याकडे पाठवला होता. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावानुसार वाकेश्वर (ता. खटाव) येथे बटाटा संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर, फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात आणि अन्य तालुक्यात अल्प प्रमाणात बटाटा लागवड करण्यात येते. अनेकदा बटाटा उत्पादक शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन होत नसल्याने शेतकर्यांची फसवणूक होते. बटाटा बियाण्याबाबत अनेकदा तक्रारी होतात. परिणामी शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.
यापूर्वी खटाव तालुक्यात बटाटा संशोधन केंद्र सुरु करण्याबाबत हालचाली झाल्या होत्या. मात्र यामध्ये यश आले नव्हते. हा प्रश्न शेतकर्यांचा हिताचा असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभेत हा विषय मांडला होता. बटाटा संशोधन केंद्राबाबत ठराव करुन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, (राहुरी)यांच्याकडे तो ठराव पाठवण्यात आला होता.
या प्रस्तावाची महात्मा फुले कृषी विद्यापीठाने गांभीर्याने दखल घेतली असून वाकेश्वर (ता. खटाव) येथील प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्यानुसार याठिकाणी बटाटा संशोधन केंद्र करण्याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेस पाठवण्यात आले आहे.































































