पुण्यात पोलीस चौक्यांना मिळतेय नवसंजीवनी, प्रायोगिक तत्वावर परिमंडळ एकमध्ये 30 चौक्यांचे पुर्नजीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नवनाथ शिंदे

पुणे-नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दलातील अमलदारांपासून अधिकार्‍यांपर्यंत पोलिस चौकी स्तरावर मोठी भूमिका बजावावी लागते. मात्र, काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणच्या पोलीस चौक्यांना आलेली मरगळ आता दूर होउ लागली आहे. हद्दीतील छोट्या -मोठ्या घटनांपासून दरदिवशीच्या हद्दीतील पेट्रोलिंग, बीट मार्शल, दामिनी पथकासह विविध कामकाजाचा आढावा घ्यावा लागत आहे. त्यानुसार संबंधित चौकीतील अमलदार आणि चौकी प्रमुखाकडून ठाणे प्रमुखांना अहवाल पाठवित आहेत. त्यामुळे पोलिस चौकीतंर्गत दाखल झालेल्या नागरिकांच्या तक्रारी, वादविवाद, अपघाताबाबतही संबंधित अधिकार्‍यांना पुर्ण माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहरातील अडगळीला पडलेल्या चौक्यांना आता नवसंजीवनी मिळाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर परिमंडळ एकच्या हद्दीतील सर्वच 30 चौक्यांमध्ये बदल करण्यात आले असून चौकी प्रमुखाला अतिशय बारकाईने लक्ष देउन काम करावे लागत आहे.

शहरात जवळपास 105 हून अधिक पोलिस चौक्या असून त्याद्वारे कायदा सुव्यवस्था, नागरिकांची गार्‍हाणे, गोपनीय अहवाल, बीट मार्शल पेट्रोलिंग करणे, घटनांची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना देणे आवश्यक आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून पोलिस चौकी अमलदार ते इन्चार्ज यांच्या कामामध्ये सुस्थपणा आला होता. त्यामुळे चौकी हद्दीतील तक्रारींचे प्रमाण ठाणे स्तरावर जाणे, हद्दीतील घटनांची माहिती संबंधित अधिकार्‍यांना नसणे, वादविवाद, अपघात, स्थानिकांची दादागिरीचा आलेख वाढला होता. त्यापार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्याकडून पोलिस ठाण्यांना नवसंजीवनी देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार विश्रामबाग, फरासखाना, खडक, समर्थ, डेक्कन, शिवाजीगन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३० चौक्यांनी कात टाकण्यास सुरूवात केली आहे. चौकी प्रमुखाच्या कार्यक्षेत्रात घडणार्‍या घटनांची इत्भूंत माहिती संबंधिताला ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलिस चौकीतंर्गत कर्मचारी, अधिकार्‍यांची संख्या, दरदिवशी त्यांच्याकडून करण्यात येणार्‍या कामांची नोंद तक्त्यामध्ये करण्यात येत आहे.

पोलिस चौकी स्तरावर कार्यरत असलेले उपनिरीक्षक किंवा सहायक निरीक्षकांनी नागरिकांच्या वादविवादामध्ये सुसंवाद निर्माण करावा. हद्दीतील चौक, सरकारी कार्यालये, मंदीर, मश्चिद, गुरूद्वार, बसस्थानके, खासगी क्लासेस, जीम, गर्दीची ठिकाणे, वारंवार घडणार्‍या गुन्ह्यांची ठिकाणे, मार्केट, ऐतिहासिक स्थळे यासह महविद्यालये, शैक्षणिक संस्थाची माहिती एकत्रित करण्यात येत आहे. त्याशिवाय हद्दीत पेट्रोलिंग करणे, गुन्ह्याचे हॉटस्पॉट शोधणे, चौकीच्या हद्दीत राहत असलेल्या गुन्हेगारांची यादी अद्यायवत करणे, रात्रपाळी चौकी अधिकारी कर्मचार्‍यांनी तक्रारदार नागरिकांच्या समस्या सोडविण्याचेही उपक्रमातंर्गत सूचित करण्यात आले आहे. चौकी स्तरांवरील माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सादर करून प्रत्येक पोलिस ठाण्यांना स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येत आहे. पोलिस ठाणे प्रमुखाकडून सहायक पोलिस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना माहितीचे सादरीकरण करण्यात येत आहे. दर आठवड्याला अशापद्धतीने माहितीचा अहवाल सादर केल्यानंतर गुन्ह्यासह बारीक सारीक घटनांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पोलिस चौकीतंर्गत कशारितीने सुधारणा करता येतील याकडेही लक्ष देण्यात आले आहे. पोलिस चौक्यांद्वारे अमलदारांपासून अधिकार्‍यांपर्यंत परिसराचा अभ्यास असावा, त्यांच्याकडे गुन्ह्यांचे विश्लेषण करण्याची चांगली क्षमता निर्माण व्हावी. एकत्रित माहितीच्या आधारे गुन्ह्याचा प्रकार कसा होता, संबंधित प्रकार रोखण्यासाठी ठाणे स्तरावर काय प्रयत्न करण्यात आले, याबाबतही आढावा घेतला जात आहे.

हद्दीतील माहितीयुक्त सक्षम पोलिस अधिकारी

पोलिस ठाण्यातंर्गत चौक्यातील अधिकारी कर्मचार्‍यांनी नागरिकांच्या तक्रारींवर प्राधान्याने तोडगा काढण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस चौक्यांना मिळत असलेल्या नवसंजीवनीचा स्थानिक नागरिकांना चांगला फायदा होणार आहे. चौकी हद्दीतील गुन्हेगार, प्रतिबंधित कारवाया, स्पॉट व्हिजिट, शाळा महाविद्यालये परिसरासह सार्वजनिक उद्यान परिसरात भेट देत कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवणे बंधनकारक आहे. चौकी स्तरावर कार्यरत असलेले उपनिरीक्षक किंवा सहायक निरीक्षक यांच्याकडील सखोल माहितीचा पोलिस खात्याला फायदा व्हावा. गोपनीय माहिती एकत्रित व्हावी, सक्षम अधिकारी होण्यासाठी चौकी स्तरावर कामाचा कस लागवा याहेतूने संबंधितांकडून जबाबदारीने काम करून घेतले जात आहे.

माहितीचा पोलिस उपायुक्त घेणार रिव्ह्यू

पोलिस चौक्यांकडून प्राप्त माहितीच्या आधारे, कारवाईची दिशा ठरवली जात आहे. चौकी हद्दीत वारंवार घडणारे गुन्हे, गुन्ह्याची पद्धत तपासली जाणार आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनाही हद्दीतील प्रत्येक पोलिस चौकीतंर्गत घडणार्‍या घटना, स्थानिक माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित माहितीचा पोलिस उपायुक्तांकडून दर आठवड्याला रिव्ह्यू घेतला जाणार आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्यावतीने पोलिस चौक्यांच्या पुर्नजीवनासाठी उपक्रम राबविला जात आहे.

नागरिकांच्या तक्रारींसह विविध घटनांवर लक्ष ठेउन कारवाई करण्यासाठी पोलिस चौकी प्रमुखांची भूमिका महत्वाची असते. विशेषतः हद्दीतील घटना, अपघात, पेट्रोलिंग, महिला सुरक्षिततेसह स्थानिक परिसरातील माहितींचे भांडार म्हणून पोलिस चौक्यांकडे पाहिले जाते. त्यापार्श्वभूमीवर आम्ही पोलिस चौक्यांकडे लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यानुसार परिमंडळ एकच्या हद्दीतील सर्वच पोलिस चौक्यामध्ये प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याद्वारे अमलदारांपासून पोलिस चौकी प्रमुखापर्यंत अधिकारी आपआपल्या हद्दीत दक्ष आणि तत्पर राहून नागरिकांच्या सुरक्षिततेवर भर देत आहेत. – रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

पोलिस चौक्यांमधील कामकाजात सुधारणा होण्यासाठी इत्भूंत माहिती असलेला अधिकारी व कर्मचारी उपक्रमाची अमलबजावणी करण्यात येत आहे. संबंधित अधिकारी कर्मचार्‍यांना हद्दीतील सर्व माहिती असावी. त्याअनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पेट्रोलिंग, महिला सुरक्षिततेवर भर देत संबंधित चौक्यांतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कामकाजातील गतीमानता वाढली आहे. त्याशिवाय आमच्या हद्दीतील 30 चौकी प्रमुखांनी एकत्रित केलेल्या माहितीच्या आधारे उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. – संदीपसिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक