पुण्यातील 9 सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दंगा, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या 9 सराईत गुन्हेगारांना शहरासह जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

शहर परिसरात मागील काही दिवसांत कोयताधारी आरोपींनी दहशत माजविली आहे. अनेक भागात वाहनांची तोडफोड, जबरी चोर्‍या, लुटमार अशा घटना घडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानूसार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी त्यांच्या हद्दीतील स्वारगेट, भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आणि सातत्याने गुन्हेगारी करणार्‍या सराईतांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये स्वारगेट पोलीस ठाण्यातील हिर्‍या उर्फ अजिज सलमान शेख , शंकर नागप्पा निकले, रोशन मिठ्ठु घोरपडे (तिघे, रा. गुलटेकडी), सहकारनगर पोलीस ठाण्यातील महेश अनिल साळुंखे, शुभम सिताराम शिंदे (दोघे, रा. धनकवडी), भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील विशाल बालाजी सोमवंशी, सुजित दत्तात्रय पवार, आकाश रविंद्र उणेचा, सुजित सरपाले अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापुढील काळात देखील गुन्हेगारांवर अशाचप्रकारे ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.