
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या (IAF) एका विमानाला अपघात झाल्यामुळे धावपट्टी पुढील काही तासांसाठी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून, यामुळे नागरी विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सुदैवाने, या अपघातात विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.
भारतीय हवाई दलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेची माहिती दिली असून धावपट्टी मोकळी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. हवाई दलाच्या विमानाला झालेल्या किरकोळ अपघातामुळे धावपट्टीवर अडथळा निर्माण झाला आहे, परिणामी प्रवासी विमानांच्या उड्डाण आणि लँडिंगवर बंदी घालण्यात आली आहे. विमानतळ प्रशासनाच्या अंदाजानुसार, परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी आणि विमानसेवा पुन्हा सुरू होण्यासाठी किमान पाच तासांचा कालावधी लागू शकतो.
या घटनेची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. विमानातील कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगत मोहोळ यांनी स्पष्ट केले की, विमान कंपन्यांना या तांत्रिक अडचणीची कल्पना देण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि धावपट्टी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासन सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Pune runway is temporarily unavailable due to an incident involving an IAF aircraft. The aircrew are safe and there is no damage to civil property. Efforts are underway to operationalise the runway and resume normal operations at the earliest.@DefenceMinIndia@SpokespersonMoD…
— Indian Air Force (@IAF_MCC) April 17, 2026
फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, पुणे विमानतळावर उतरणारी किमान आठ विमाने या गोंधळामुळे वळवण्यात आली आहेत. ही विमाने प्रामुख्याने सुरत, गोवा, नवी मुंबई, चेन्नई आणि कोईम्बतूर येथील विमानतळांवर उतरवण्यात आली आहेत. धावपट्टी पुन्हा कार्यान्वित होईपर्यंत पुणे विमानतळावर येणारी आणि जाणारी सर्व विमाने विलंबाने धावण्याची शक्यता आहे. हवाई दलाचे माध्यम समन्वय केंद्र सध्या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून तांत्रिक तपासणीनंतरच धावपट्टी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.





























































